पुणे | पुण्यातील प्रा.डॉ. प्रशांत साठे आणि अभिजित पाटील यांची २०१७-१८ या पुढील वर्षाकरिता अनुक्रमे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व प्रदेशमंत्री म्हणून निवड झाली. निर्वाचन अधिकारी प्रा. निर्भय विसपुते यांनी प्रदेश कार्यालय पुणे येथून ही निवड घोषित केली.
प्रा.डॉ. प्रशांत साठे यांचे शिक्षण M.COM, Ph.D. पर्यंत झालेले असून ते पुणे येथील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व संशोधन केंद्राचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना एकात्म मानवदर्शन तसेच भारतीय प्राचीन दर्शनांमध्ये विशेष रुची व अभ्यास आहे. यापूर्वी त्यांनी पुणे महानगर उपाध्यक्ष, पुणे महानगर अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध दायित्वांचे निर्वहन केले. वर्ष २०१५-१६ तसेच २०१६-१७ मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. आता वर्ष २०१७-१८ साठी प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची फेरनिवड झाली आहे.
अभिजीत पाटील मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे कला शाखेत पदव्युत्तर पदवी व शिक्षणशास्त्रात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ते २००६ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात आहेत. कोल्हापूर जिल्हा संयोजक, सातारा जिल्हा संयोजक, सोलापूर जिल्हा संघटनमंत्री, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विभाग संघटनमंत्री, महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. कोल्हापुर व कराड येथे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, D.Ed. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कराड येथे झालेले आंदोलन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर काढलेला ‘छात्र गर्जना’ मोर्चा अशा विविध आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ विभाग संघटनमंत्री असताना ‘छात्रसंसद’ या कार्यक्रमाचे त्यांनी नांदेड, लातूर व परभणी येथे यशस्वी आयोजन केले. शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात झालेल्या महाराष्ट्रव्यापी आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला. वर्ष २०१७-१८ करिता त्यांची महाराष्ट्र प्रदेश मंत्री म्हणून निवड झाली आहे.
येत्या २४, २५ व २६ डिसेंबर २०१७ रोजी जळगाव येथे होणाऱ्या ५२ व्या प्रदेश अधिवेशनात नवनिर्वाचित अध्यक्ष व मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली जाईल