ग्रामीण भागात बऱ्याच समजुती व अंधश्रद्धा अशा असतात की त्या येणाऱ्या पिढीची मानसिक वाट लावून टाकतात. असा अनुभव मी लहानपणापासून घेत आलोय पण आज एक लहान मुलीला दवाखान्यात घेऊन आलेला बाप हे म्हणत होता. मी शांत चित्ताने ऐकून घेतलं.
“म्हटलं का बरं शांती घालावी लागलं”?
पणजी पोटाला आलीय, ती किरकिर करते,हट्टीपणा करते मग जोपर्यंत शांती होणार नाही तोपर्यंत हे कमी होणार नाही. 5 वर्षाची झाली की शांती घालायला सांगितलीय…
वास्तविक ज्यावेळी मुलांना ही गोष्ट कळते की आपण मागितलेली कोणतीही गोष्ट थोडा हट्ट केला की मिळते, मग त्यांना ते निम्मित होत. आजी,पणजी पोटाला आली म्हणून तिच्या इच्छा पूर्ण करा असा पालकांचा गैरसमज असतो,अज्ञान असतं. यातून होत इतकंच की हीच मुलं मोठी झाली की कोणत्याही गोष्टीकरता अजिबात ऍडजस्ट करत नाहीत, छोट्या छोटया गोष्टीसाठी भांडायला उठतात. राग तर त्यांच्या नाकावर सदा स्वार असतो. अतिप्रेम आणि अज्ञान माणसाच्या स्वभावात कसा नकारात्मक बदल घडवत त्याच हे उदाहरण.
याविरोधात पालकांची समजूत घालण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर ते “बाकीचे करतात ते काय वेडे हायेत का”? म्हणून ते आपलीच बोलती बंद करतात. आपण जगाला कितीही ज्ञान शिकवत असलो तरी अशा गोष्टीसाठी सर्वात जास्त विरोध हा आपल्या घरातून होत असतो. या जुन्या प्रथा, विचार इतक्या घट्टपणे लोकांच्या मेंदूत भिनलेत की त्याबद्दल अवाक्षर जरी बोलाल तरी तुम्हीच मूर्ख कसे हे दाखवून दिलं जात.
(नावरस असणं हा समज आहे की ज्यात आपले पणजा, पणजी किंवा पूर्वज लहान मुलाच्या रूपाने पोटाला येतात आणि त्रास देतात आणि त्यांना शांत करण्यासाठी शांती करणं हा विधी करावा लागतो)
डाॅ. कृष्णा सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)