ज्यांना आपलं दुःख खुप वाटत,ज्यांना आयुष्याने सगळे अत्याचार आपल्यावरच झालेत अस वाटत,आपल्या आई बापाने आपल्यासाठी काहीच केलं नाही असं वाटत त्यांनी हा लेख आवर्जून वाचा,आणि ठरवा की खरं दुःख काय असत.
तर ती आली होती 5 पोरांचं लटाम्बळ घेऊन दवाखान्यात.हातातल्या तंबाखुला चुना लावत माझ्या प्रश्नाचे उत्तर देत होती.मोठा मुलगा 9 वर्षाचा त्याला जुलाब उलट्या होत होत्या.गाल आत बसलेले,हाडाच्या काड्या झालेल्या.विचारलं शाळेत कितवीला आहे?
“त्यो शाळत जात नाही”ती म्हणाली.
का बरं जात नाही? पोरांला शाळेत घातलं तर शिकतील अस बरंच काही सांगितलं पण ती थोडी पण सकारात्मक वाटेना.थोडं खोलात चौकशी करावी म्हणून माहिती घ्यायला लागलो तर क्षणभर माझंच डोकं सुन्न झालं.
पोरांचा बाप या दसऱ्याला मेला, सारखा दारू प्यायचा. कुटुंब नियोजन म्हणजे कशा बरोबर खातात हे माहित नसल्यामुळे दरवर्षी 1 प्रमाणे लागोपाठ 5 मुलं झाली.अस पण नवरा जिवंत असून फक्त कुंकवाला भार होता नुसता दारू पिऊन पडायचा.ती रोज लोकांच्या शेतात कामाला 200रु रोज.म्हणजे 6 माणसांचं पोट 200 रुपयात भरणार.त्यात अचानक काही खर्च उदभवला की कर्ज घ्यायचं सावकाराकडून मोठया व्याजाने आणि तेच पैसे फेडत बसायचं आयुष्यभर.
रेशन कार्ड नाही,बँक अकाउंट नाही,आधार कार्ड नाही,सरकारी योजना काय असतात माहित नाही.चांगले रस्ते नाही,प्यायला पाणी नाही अशी सगळी अवस्था आहे आदिवासींची ठाणे जिल्ह्यात.
आता ही पोर शाळेत जात नाहीत म्हणजे पुढच्या दोन पिढ्या मुख्य प्रवाहात येणार नाहीत.त्यात अज्ञान,व्यसन,अंधश्रद्धा यांनी जखडलेलं यांचं आयुष्य यांना माणूस म्हणून कधीच जगू देणार नाही.नेमकं मरण नको म्हणून जगतो आहोत का आपण हे पण कळत नाही यांना. रोज लढायचं,रोज मरायचं.
कधी कधी वाटत ज्या आईबापांनी आपल्यासाठी इतक्या खस्ता खाऊन हे सोन्याचे दिवस दाखवले ते ग्रेटच आहेत.निदान त्यांनी शिक्षणाचं महत्व जाणलं म्हणून मी लिहू शकलो आणि तुम्ही वाचू शकलात.
तिला आणखी प्रश्न विचारावेसे मला वाटले नाही,जे विचारलं त्यातूनच इतकं गलबलून गेलो.जे रोज अस आयुष्य जगतायेत त्यांच्या दुःखाची आपण कशी बरोबरी करायची?
डॉ.कृष्णा सुभाष सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)