प्रेमात पडून २-३ वर्षाचा काळ लोटलाय किंवा प्रेमाचं रूपांतर विवाहात होऊन एखादं मुलं बाळ झालं की हे वाक्य सर्व स्त्रियांच्या तोंडपाठ होत. मुळात आपण प्रेमात पडतो म्हणजे काय होत आणि त्यामुळे मेंदूच्या पातळीवर काय घडत याची माहिती आपण करून घेऊ
प्रेमात पडताना महत्वाचं काय घडत तर आपण आपल्या अहंकाराच्या मर्यादा वितळवून समोरच्या व्यक्तीशी एकरूप होतो, तो जो हट्ट करील ते मान्य करतो, ज्या गोष्टी पटत नसतील त्याही मान्य करतो कारण ती व्यक्ती आपल्यासाठी सर्व काही असते. त्या व्यक्तीला दुःखवून चालणार नाही म्हणून आपण स्वतःमध्ये बदल करून घेतो.
प्रेमात पडलेल्या माणसाच्या मेंदूवर संशोधन करण्यात आल, त्यावेळी अस आढळून आलं की प्रेमाचा प्रभाव एखादया नशेप्रमाणे असतो. मेंदूतील नशा केल्याने जे भाग उत्तेजित होतात तेच भाग प्रेमात असल्यावरही उत्तेजित होतात. हवेत असल्यासारखं वाटत,आतापर्यंतचा हा वेगळाच अनुभव असतो आणि तो सतत हवाहवासा वाटतो. प्रेमात पडल्यावर भुक, झोप मंदावते. एका वेगळ्याच विश्वात आपण फिरत असतो. ती व्यक्ती बोलली नाही की प्रचंड अस्वस्थता येते, सतत मोबाइलवर नजर लागलेली…. आता त्याचा फोन येईल किंवा मेसेज येईल….
प्रेमाची नशा कशी वाढते व कमी होते याच्या ३ पायऱ्या असतात
१) तीव्र इच्छा
न बोलता एकमेकांवर कटाक्ष टाकणे, डोळ्यांनी बोलणे मुख्यत्वे: शारीरिक आकर्षण. याचा कालावधी 1 ते 3 महिन्यापर्यंत असतो.
२) मोहाची किंवा असक्तीची अवस्था
या अवस्थेत आपल्याला फक्त समोरच्या व्यक्तीचे सद्गुण दिसतात आणि आपण त्याच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करतो. यात जर हे प्रेम एकतर्फी असेल आणि पाहिजे तो प्रतिसाद समोरच्या व्यक्तीकडून मिळत नसेल तर काहीजण स्वतः आत्महत्या करण्याचा किंवा समोरच्या व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न करतात. “प्रेमात पडल्यापासून तो हवेत असतो”, “प्यार आदमी को अंधा बना देता है” या प्रकारची वाक्ये या अवस्थेसाठी म्हटली जातात (Dopamine,NorAdrenaline,Serotonin,Phenylthylamin केमिकल्सनी मेंदूचा ताबा घेतलेला असतो) या अवस्थेचा कालावधी ३ महिने ते १२ महिने असतो.
३) जोडायची अवस्था, नातं टिकवायची अवस्था
ज्यावेळी प्रेमाची नशा उतरायला लागते.तरीही आपण एकमेकांच्या चुका पोटात घेतो कारण नातं टिकवायच असत, या काळात बऱ्याच वेळा समजुतदारपणा आपण दाखवतो, या अवस्थेचा काळ २-३ वर्ष असतो. ज्यात आपण हवेतून जमिनीवर येतो. खरी गोष्ट इथून सुरु होते प्रेमाला उतार लागलेला असतो,
स्वतःच्या अहंकाराच्या मर्यादा आता बळकट व्हायला लागतात त्यावेळी मग एकमेकांचे उणेदूणे काढायला सुरुवात होते, छोट्याछोट्या गोष्टीसाठी एकमेकांना टोमणे मारले जातात. ज्यावेळी अशा भावनांचा कडेलोट होतो त्यावेळी स्त्रियांना प्रेमाचे सुरुवातीचे दिवस आठवतात, त्यावेळी तर म्हणे हा, चंद्र तारे तोडतो म्हणाला होता आणि आज साधं मला समजून सुद्धा घेत नाही मग त्या म्हणतात,
“तु हल्ली माझ्यावर पहिल्यासारखं प्रेमच करत नाहीस”…
डॉ. कृष्णा सुभाष सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)