रुतल्या काळजाच्या ठिकऱ्या झालेले आपण बोलू शकत नाही मनातलं आरपार
जीवनाचं दुःखद व्यसन जडलेले आपण तोडू शकत नाही पाश भोवतालच्या जगण्याचे
संघर्षाच्या लाटांनी मोकार सुटलेल्या जगात आपण
भरकटत राहतो किनाऱ्या किनाऱ्यावरून
अनेक स्वप्नांची मेहंदी मेंदूवर सजवणारे आपण
एकटक पाहू शकत नाही तिला विरताना
पैश्याच्या मायाजाळात स्वतःचा आत्मा विकणारे आपण
बघता येत नाही आरशात धूळ माखल्या चेहऱ्याने
हृदयावर रेघोट्या ओढून खोटी आनंदाची चित्रे काढणारे आपण
सदा दोन चेहरे घेऊन फिरत राहतो व्यवहारी जीवनात
यातनांच्या डोंगरावर एकटेपण भोगत असणारे आपण
सोडवू शकत नाही पीळ अंतरंगात पडणारे गाठींचे
गर्भार राहू शकतो पण जन्म देऊ शकत नाही आपण
करावाच लागतो गर्भपात विचारांचा ज्याला त्याला
व्यक्त जीवनाचा कोणताही नांगर फिरवू शकत नाही आपण
करू शकत नाही उपजाऊ जमीन वांझोट पडलेल्या मनाची
मागास जगावं की आधुनिक हे शेवटपर्यंत न समजलेले आपण
धावा करू शकत नाही अस्तित्व हरवलेल्या कोणत्याच देवाचा
डॉ.कृष्णा सुभाष सपाटे
(कवी द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)