मुंबई | शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणाऱ्या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करुन देणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातील सादरीकरण करुन या योजनेची घोषणा केली.
गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. याशिवाय एसटी महामंडळाच्या इतर अनेक लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात आज झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.