भारतीय राष्ट्रध्वज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २५ दिवस आधी निर्माण केला गेला. या झेंड्यामध्ये तीन रंगाच्या आडव्या पट्ट्या आहेत. त्यात सर्वात वर केसरी मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे म्हणून आपण आपल्या ध्वजाला तिरंगा म्हणतो. त्याचबरोबर सम्राट अशोक यांनी बांधलेल्या सिंहमुद्रा यातून अर्थातच अशोक चक्र ध्वजाच्या मधोमध आहे. २२ जुलै १९४७ साली आपल्या राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती झाली.
डाॅ. एस. राधाकृष्णन यांनी आपल्या राष्ट्रध्वजाची रचना आणि महत्व स्पष्ट केले आहेत.
“ध्वजातील वरच्या केसरी रंगातून त्याग आणि धैर्याचा बोध होतो. मधल्या पाढ-या रंगातून सत्य, शांती आणि पावित्र्याचा बोध होतो. खाली दिलेल्या हिरव्या रंगातून निसर्ग, भूमी, निष्ठा याची प्रचिती मिळते. निळ्या रंगाचे अशोकचक्र समुद्राप्रमाणे अथांग आणि कालचक्रानुसार बदलत राहते याची विश्वाला जाणीव करुन देतो.”
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अतिशय मोठा इतिहास आहे. त्यामुळे राष्ट्र निर्माण झाल्यानंतर आपण तिरंगा ध्वजाला राष्ट्रध्वज मानतो पण स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रध्वज ही महत्त्वाची संकल्पना होती. सर्वप्रथम १९०६ मध्ये भारतीय झेंड्यामध्ये तीन रंगाचा समावेश करण्यात आला. सर्वात वर गडद निळा आणि त्यात आठ चांदण्या. मधल्या पट्टीत पिवळा रंग आणि मधोमध वंदे मातरम् हे देवगिरी भाषेत लिहिलेल. सर्वात खाली लाल रंगाची पट्टी त्यात एका बाजूला सुर्य तर दुसरीकडे चंद्र होता. पुढे १९०७ मध्ये झेंड्यात थोडा बदल आढळून येतो. सर्वात वर हिरव्या रंगाची पट्टी, त्यात आठ कमळाची फुले, पिवळा रंग तसाच ठेवला वंदे मातरम् पण तसेच होते. खालच्या पट्टीत केसरी रंग साकारण्यात आला. एका बाजूला चंद्र दुसरीकडे सूर्य होता. त्यानंतर १९१६, १९१७ व १९३१ या काळात झेंड्यामध्ये मोठया प्रमाणात बदल झाले. सर्वात वर केसरी मध्यभागी शुभ्र पांढरा आणि सर्वात खाली हिरव्या रंगाची पट्टी अशी रचना करण्यात आली. शुभ्र पाढ-या रंगात निळ्या रंगाच्या चरख्याला समाविष्ट करण्यात आले. शेवटी २२ जुलै १९४७ हा दिवस भारतीय राष्ट्रध्वजासाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी वर केसरी मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला हिरव्या रंगाच्या पट्ट्या आणि मध्यभागी असलेल्या पांढ-या रंगात निळ्या रंगाचा अशोकचक्र समाविष्ट करण्यात आले.
– रवी चव्हाण
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे कार्यकारी संपादक आहेत)