मुंबई | वाढत्या कचऱ्याची समस्या लक्ष्यात घेता “सेवक फाऊंडेशन”आणि “जय फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमानाने दादर लगतच्या किनाऱ्याची साफ सफाई चे एक अनोखे अभियान प्रजासत्ताक दिनानिमित्त राबवले गेले.
ह्या अभियानात मुंबई व ठाणे विभागातून महाविद्यालयीन विद्यार्थी ,एन. एस. एस. युनिट आणि श्रमदानासाठी स्थानिक लोक हे मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
दिवसेंदिवस वाढत्या कचऱ्याची समस्या आणि त्याचे होणारे दुष्परिणाम तसेच इतर सामाजिक समस्या आणि त्यांवर कशाप्रकारे मात करावी ह्याची जाणीव “सेवक संस्था” युवकांना विविध माध्यमातून वारंवार करून देत असते असे मुंबई विभाग समन्वयक तुषार वारंग यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन ‘सेवक फाऊंडेशन” ने कचरा व्यवस्थापन ह्या उपक्रमाद्वारे “सेवक संस्थेच्या” पहिल्याच कामाची जोरदार सुरवात केली आणि त्याला जोड म्हणुन “जय फाऊंडेशन” या संस्थेने जमलेल्या लोकांना कचरा उचलण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची व पाण्याची व्यवस्था करून दिली. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही उत्स्फूर्तपणे राबवण्याचे आश्वासन ठाणे जिल्हा समन्वयक अंजुम मुलानी यांनी दिले. सेवक चा पहिलाच उपक्रम आणि मराठी अभिनेता ,कलाकार महेश मांजरेकर व गायक अजित परब यांनी हजेरी लावली व युवकांना प्रोत्साहन दिले.
“तरुणाईच्या हाती,समाजसेवेच्या ज्योती” हे सेवक संस्थेचे उद्देश असुन जास्तीत जास्त युवकांच्या मनात सामाजिक जाणिव निर्माण करून देण्याचे काम व उपक्रमात सहभागी करून घेण्याचे काम सेवक फाऊंडेशन करत असते.
पुढेही एकमेकांना साथ देऊन असे उपक्रम राबिवले जातील असेही आश्वासन “जय फाऊंडेशन” चे संस्थापक जय शिंगारपुरे यांनी दिले.