सुकलेल्या झाडाच्या फांद्या ओरबाडल्यागत
कंठाशी प्राण आले असताना
रखरखीत उन्हात घश्याची कोरड
पाण्याच्या शोधात वणवण फिरताना
स्वप्नांची धूळधाण झाल्यावर
त्याचाच भंडारा कपाळावर माळताना
अर्जुना! तुला आठवतंय का जिंदगीच भिरकावून टाकणार गाणं?
एक एक वीट रचून बनवलेला महाल कोसळतो तेंव्हा
निळ्याशार पाण्यात ज्वालामुखी किंचाळतो तेंव्हा
सुखांचा धावा करूनही दुःखाचा पर्वत तरारून येतो तेंव्हा
अर्जुना! कोणाकड याचना करायची?
तुझ्याकडं धनुर्धारी विद्या
तुझ्याकडं महाभारताची प्रत्यांचा
तुझ्याकडं कृष्णाच सारथीवैभव
तु लपून बाण मारला तरी तूच बरोबर
तूच प्याद अन तूच निकालात काढणारा
अर्जुना! तुझं वाईटही चांगल म्हणून खपत कस?
तुझ्या डिप्रेशनला गीतेचा साज
तुझ्या काळज्या चिंता जगाने वाहायच्या
तुझ्या प्रश्नांना हमखास उत्तर
तू हरला काय नी जिंकला काय
विजयही तुझाच आणि राज्यही तुझंच
अर्जुना! अशा एकारलेल्या दुनियेचा तू अनभिषिक्त सम्राट?
आम्ही मात्र काय करायचं?
उपाशी पोट घेऊन कोणाशी भांडायचं
दाताखाली खडा लागला
नात्यांची रांगोळी विरली
विश्वासाचं पानिपत झालं
जिवाभावाची अर्ध्या आयुष्यात पसार झाली
जगण्याच्या भीतीने पोटात खड्डा केला
स्वप्नांची खांडोळी खांडोळी झाली
होत नव्हतं वाहून गेलं की
तू गीतेच सार सांगून मोकळं होणार
आम्ही पापी तसच रडत मुरडत जगायचं
हुकूमशाही खाली नाक रगडत बसायचं
सतत हुजरेगिरी करायची
स्वाभिमान कायमचा चेचून घ्यायचा
नीतिमूल्ये बॉम्बला बांधून उडवून लावायची
लाचेला कायम जगवत ठेवायचं
व्यसनांना मेंदूच्या जाळ्यात अडकवून
सततच्या प्रश्नांना तात्पुरती मलमपट्टी करायची
सत्तेच्या पायात तुडवून घ्यायचं
गर्भगळीत होऊन भोगत राहायचं वाट्याला आलेलं जिणं
वनवासांचं काहूर संपता संपत नाही
जन्माला यायचं अन खुरडून खुरुडून मरून जायचं
मानसिक आजारांचे सर्प गळ्यात अडकवून फिरत राहायचं
प्रत्येक घराला मोठाली भगदाड
प्रत्येक घराच्या उशाशी अंधाराची काळी छाया
आयुष्यभर गाळ उपसत राहायचं आणीबाणी लागल्यागत
अर्जुना! तू स्वर्गात गेलास
आमच्या वाट्याला नरकाचा काटेरी रस्ता तरी ठेवशील का?
डॉ. कृष्णा सुभाष सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)