मुंबई | राज्याच्या अतिरिक्त साधनसंपत्ती उभारणीबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य शासनाने अनेक पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे हाती घेतली असून या सर्व विकासकामांना गती देण्यासाठी अतिरिक्त साधन संपत्तीची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा,महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, बांधकाम कल्याण कामगार मंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासह इतर मंडळे, महामंडळे आणि प्राधिकरणाकडील अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या कर्जरोख्यात गुंतवल्यास राज्य शासन, महामंडळे आणि मंडळे या दोघांनाही फायदा आहे. या निधीवर महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणाचाच अधिकार राहिल, त्यांना पाहिजे त्यावेळी त्यांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.