तुमचे प्रेमावरचे विचार ऐकले. ऐकून छानच वाटले. पण ते पारंपरिक आहेत हे सांगताना मला वाईट वाटते. कारण प्रेमाचे हे उदात्त रुप ज्यांनी आपल्यासमोर वाढून ठेवले आहे त्यांना तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष जगण्यातलं अंतर मोजता आलेलं नाही. ते कायम लौकिक जगात राहून अलौकिकाची आसक्ती धरत आले आहेत म्हणून ते मला दांभिक वाटतात. हिंदी पिच्चरांनी प्रेमाला अधिक अवास्तव रंगवले आहे. सगळ्यात आधी स्वत: वर प्रेम करायला शिका. आपण आहोत म्हणून जग आहे. आपल्यापेक्षा या जगात काहीच मोठं नाही. प्रेमासाठी माणूस नाहीये, तर माणसासाठी प्रेम आहे. प्रेम त्याग नाही तर स्वीकार शिकवते. प्रेम दु:खं नाही, तर आनंद शिकवते. प्रेम मूळात देहातीत नाहीच आहे. आपल्याकडे शारीरिक प्रेम आणि अशारिरीक प्रेम, वासना आणि शुध्द प्रेम असे भेद केले जातात. ते चूक आहे. आपल्या ऐंद्रिय संवेदनाच प्रेमाच्या वाहक असतात, म्हणून शरीर हे मनापर्यंत पोचण्याचं साधन आहे. वासना नैसर्गिक आहे. त्याला नाकारणे म्हणजे नैसर्गिकता नाकारणे, वास्तव नाकरून कल्पनेच्या जगात भराऱ्या मारण्यासारखे आहे.
भारतीय परंपरेत प्रेमाचे जे चित्रण झालेले आहे ते बहुतांश आध्यात्मिक स्वरुपाचे आहे. जे अस्तित्वातच नाही त्याचेच रसभरीत वर्णने आढळतात. मी नास्तिक आणि पूर्णपणे ईहवादी असल्यामुळे वास्तव काय आहे, डोळ्याने मला काय दिसतं आणि ऐंद्रिय संवेदनेद्वारे काय जाणवतं त्यावरच मी विश्वास ठेवतो.
एरव्ही आपण आयुष्याच्या आगीत सतत होरपळतच असतो ना. मग प्रेमात पुन्हा होरपळणार असू तर ते कशासाठी करायचे? आपला जन्मच अभावांच्या दुनियेत झालेला आहे. त्यात पुन्हा प्रेमातही त्याग करावा लागत असेल तर तो कशासाठी करायचा? आयुष्य हे एकदाच लाभते तेंव्हा ते सुखाने जगून घेणे, मिळतील तेवढे आनंदाचे क्षण वेचून घ्यावे असे मला वाटते. फक्त हे सगळं करत असतांना आपल्याकडून कुणाच्या सुखाचा व आनंदाचा संकोच होवू नये याची काळजी घ्यावी. बस एवढंच पाळा आणि दणकून प्रेम करा. एक तुटलं की दुसरं करा. दुसरं तुटलं की तिसरं करा.
सुदाम राठोड
(लेखक मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत)