फुटलेलं धरण वहाव तस
पूर येऊन वाहणारा मी
त्या काळ रात्री कोणाला बिलगणार होतो?
कोणाच्या पंखाखाली उबाऱ्याला जाणार होतो?
बाहेर पावसाची टिपिरघाई
आत तुझ्या जाण्याने
काळवंडलेला मी
कोसळलेला मी
वाटलं नव्हतं कधी
पाऊस इतका अत्याचार करेल म्हणून
याच पावसात तुला मिळाली चिरनिद्रा
मृत्यूची मगरमिठी तुला सोडवता नाही आली
वेदनेची शेवटची कळ तुला जिंकता नाही आली
जाताना तू गेलेली पावलं
माझ्या हृदयात फसलेली
काळीज ओवून मी मालवत राहतो
तुझ्या आठवणींचे प्रदीप्त दिवे
तुझ्या शरीराचा अंश म्हणून
मागे ठेवून गेलेला मातीचा गोळा
तुझं आई होणं
माझं अनाथ होणं
इतकीच त्या शेवटच्या रात्रीची खूण
त्या इवल्याश्या किरमिजी डोळ्यांत
मी ढेकळासारखा विरघळून जातो
तुझ्या वस्तीचा पत्ता विचारत राहतो
डॉ.कृष्णा सुभाष सपाटे
(कवी द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)