निराश असणं म्हणजेच जे आपल्याला हवंय ते न मिळण. निराश व्हावं लागण याच कारण शोधायला गेलं तर अस दिसून येत की गरजेपेक्षा किंवा वास्तवापेक्षा जास्तीची अपेक्षा करणं, चुकीच्या पद्धतीने अपेक्षा ठेवणं हे दिसून येईल. जितकी अपेक्षा वास्तवापेक्षा जास्त तितकी निराशेची दरी खोलचखोल. अशा वेळी दुःखानी मनाच्या आत घर केलेलं असत, एक विफलता मनात भरून उरलेली असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बऱ्याच अपेक्षांची न सरणारी माळ आपण ओवत असतो. आपल्याला वाटत असतं की ही अपेक्षांची माळ आपल्याला आनंद देईल, आपल्याला खुश करील. पण घडत वेगळंच म्हणजे सगळ्याच अपेक्षा फलद्रुप होतात अस नाही पण ज्या होतात त्यांनी मात्र एक वैराणता मनात येते. पण ही निराशा येण्यापाठीमागे खर कारण काय असावं हे मात्र आपण शोधायचं विसरून जातो.
या निराशेवर दोन उपाय योजता येण्यासारखे आहेत. एकतर गरजेपेक्षा जास्तीच्या अपेक्षा करू नये आणि दुसरं म्हणजे वास्तवाचं भान ठेवावं म्हणजेच काय होऊ शकत किंवा नाही. अपेक्षा करणाऱ्या लोकांच्या वेगवेगळ्या विचारप्रक्रियेमुळे त्यांच्या आनंद व दुःखात फरक पडत राहतो. ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे याकडे तुम्ही कस पाहता यावरही तुमच्या निराशा व दुःखाचा उगम आहे.
१) जे आपल्याजवळ आहे त्याबद्दल समाधानी राहणं आणि जे आपल्याला हवं आहे, याबद्दल अपेक्षा ठेवून कार्यरत राहील तर जास्तीची निराशा पदरी पडत नाही. उदाहरणार्थ आज माझ्याकडे एक मारुतीची कार आहे आणि भविष्यात मला मर्सडीझ घ्यायची आहे, त्यासाठी मी प्रयत्न करील.
२) जे आपल्याजवळ आहे याबाबत समाधानी नसणं आणि जे लोकांकडे आहे, अशा गोष्टींसाठी जास्तीच्या अपेक्षा ठेवल्याने मात्र निराशा पदरी पडणार हे मात्र नक्की. उदाहरणार्थ प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांबरोबर स्वतःची तुलना करत राहणे.
येणारी प्रत्येक निराशेच जर आपण परीक्षण केलं तर कदाचित आपल्याला काय चुकलं, कुठं चुकलं, कस चुकलं हे कळू शकत. ती प्रत्येक गोष्ट समजून उमजून त्याचा योग्य अर्थ घेऊन वास्तवाचं भान ठेवून उचलेली पावलं भविष्यात येणाऱ्या संकटापासून व मनात उठणाऱ्या वावटळीना दूर ठेवू शकतील.
डॉ.कृष्णा सुभाष सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)