मुंबई | भारत हा विश्व गुरु होऊ शकतो. त्यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेची आमूलाग्र अशी चिकित्सा करावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात राज्यपाल श्री. राव बोलत होते. राजभवन येथे झालेल्या या शानदार समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू खासदार भारतरत्न सचिन तेंडुलकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस आदी मान्यवरांची उपस्थिती होती.