बऱ्याच गोष्टींच महत्व आयुष्यात ती वेळ निघून गेल्यावर किंवा आता आपण बुडणारच आहोत अशी असहायता हातात येते त्यावेळी जाणवत राहते.आयुष्यभर काम,घरसंसार, नाती,पैसा, नाव, अहंकार याला माणूस असा काही फेवीक्विक सारखा चिटकून बसलेला असतो की ज्यावेळी हे चिकटलेपण सुटत त्यावेळी पश्चातापच दुःख त्याच्या मनाला अस मोठं भगदाड पाडत की जे मरेपर्यंत बुजणारच नसत.शरीर थकल्यावर मरण जवळ आल्यावर हे पश्चातापाचे दुःखद पक्षी ज्यावेळी मनाच्या घरट्यात स्थिरवतात. त्यावेळी स्वतःला कोसत बसणारे मन मेलेली म्हतारी असहाय माणसं दिसत राहतात.
ब्रोनी वेयर नावाची एक ऑस्ट्रेलियन नर्स जी शेवटच्या काही दिवसात मरणाऱ्यांची शुश्रूषा करते, ज्यावेळी तिला या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले की मरण्याआधी या म्हाताऱ्या माणसांच्या पश्चातापाबाबत तुझं काय निरीक्षण आहे. त्यावेळी तिने सांगितलेली काही निरीक्षणे काय असतील बर?
की ते भरपूर पैसे कमवू शकले नाही?
की ते काम करू शकले नाही ?
की त्यांना घर नव्हतं?
तर ती होती पुढीलप्रमाणे
●माझ्यात अस धैर्य मी का एकवटू शकलो नाही की मला माझ्या मनाप्रमाणे जगता आलं नाही, त्याऐवजी मी इतरांना काय हवंय हेच ठरवून का जगत गेलो?
●मी माझ्या भावना व्यक्त का करू शकलो नाही,ज्या मोठया धैर्याने मी व्यक्त करू शकलो असतो?
●मी माझ्या मित्रांच्या आणि कुटुंबाच्या जवळीक राहू शकलो असतो तर?
●मी माझ्या आयुष्यात आणखी थोडासा प्रयत्न आणि कष्ट केलं असत तर?
●मला सुखी व समाधानकारक जीवन जगता आलं असत तर?
आज त्यांना जाणवतं आहे की आपण आयुष्यभर केलेल्या निवडीच या शेवटच्या क्षणात आपल्याला बाधल्यात, ज्या चूका आपण केलेल्या आहेत त्या आता कधीच दुरुस्त होणार नाहीत आणि त्या आपल्या या देहाबरोबरच मातीत मिसळून जाणार आहेत.बऱ्याच जणांनी आपल्या भावनांवर वजन टाकून त्या कायमच्या दाबल्या कोणा इतरांच्या सुखासाठी,ज्याचा परिणाम या आयुष्याच्या संध्याकाळी ते भोगताहेत. बऱ्याच जणांना या दाबलेल्या भावनांनी एक अनोखी भेट दिलीय ज्यात आहेत कॅन्सर,मधुमेह, हृद्यरोगासारखे आजार.आता या पश्चातापावर उपाय म्हणाल तर काय करायचं? तर आज आणि इथुनपुढे जे आयुष्य आपल्या ओंजळीत आहे ते मोठ्या आनंदाने जगायचं. वरती लोकांनी ज्या चुका केल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा. जीवन भरभरून जगायचं, लवचिकता मनात जोपासायची, आयुष्याचा दृष्टिकोन बदलायचा.
डॉ.कृष्णा सुभाष सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)