मानवी मनोविश्वावर व जगण्याच्या तत्वज्ञानावर विचार करायला भाग पाडणार हे पुस्तक. एरव्ही माणूस जगताना बारीकसारीक गोष्टींचा कधीच विचार करत नाही त्यामुळे घडत अस की, जे नको असत तेच घडत. समाजात जगणारा माणूस नावाचा प्राणी आपल्या आजूबाजूला एक रिंगण आखून उभा असतो. त्या रिंगणाबाहेर पडायचं नाही किंवा कोणाला आत येऊ द्यायचं नाही असं ते जगणं असतं. त्याच्या वागण्यात किंवा विचारात लवचिकता नसते. जर अशी लवचिकता विचारात असेल तर मनुष्य आयुष्य सुखासुखी जगू शकतो हे तितकंच खरं आहे.
या जीवनाची व जगण्याची नव्याने मांडणी करता आली तर? या वांझोटया जगण्याला नव्या विचाराने पेरता आलं तर? तर बदल नक्कीच घडू शकतो. हे पुस्तक नवे विचार तुमच्या मनाच्या जमिनीत रुजवायला मदत करील, वेगवेगळे दृष्टिकोन मांडील. राजन खान सरांच्या व्यक्तिगत जीवनातले अनुभव या पुस्तकाच्या पानांपानात व्यापून आहेत. मनात असणारी घुसमट शब्दबद्ध करताना त्याच्यावर उपाययोजनाही काय करायला हव्यात यावर मार्मिक भाष्य लेखकाने केलेलं आहे. काळात घडून गेलेले बदल आणि बदलत जाणारा समाज यावरही प्रकाशझोत टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न आपल्याला वाचताना कळू लागतो. मानवी मूलभूत गरजा खूप कमी असून देखील, दिखाव्याचं अवडंबर माणसाने खूप माजवलेलं असताना समाजाला विचार करायला भाग पाडणार हे पुस्तक आहे. आधुनिक विचारांच्या नावाखाली स्वतःचा हव्यास भागवणारा माणूस रेखाटण्याचा उदाहरणासहित प्रयत्न “विविधता की एकता” या लेखात आपणास पहावयास मिळतो. तर “दोन नवऱ्यांची एक बायको” हा लेख वाचताना वेगळं काही तरी वाचल्याचा अनुभव येतो.
थोडक्यात काय तर वैयक्तिक, सामाजिक आणि मानसिक अनुभवांच्या लेखांची ही मालिका आहे ज्यात राजन खान सर व्यक्त होत जातात आणि ते व्यक्त होणं आपण आपल्या आयुष्याशी जोडून पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यातून होत असं की आपल्या रोजच्या जगण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. आपलीही घुसमट आणि ठसठस नाहीशी व्हायला मदत होते, विचारप्रवाहाला योग्य वळण मिळत. पुस्तकाच्या शिर्षकाप्रमाणे या “निबार जगण्याची दुबार पेरणी” पुस्तक वाचून नक्कीच होते जर ते अनुभव जीवनात प्रत्यक्षात उतरवले तर…
डॉ.कृष्णा सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)