युद्धासाठी वापरल्या जाणार्या सैनिकांना आपण देशासाठी नाही तर, मुठभरांसाठी ‘वापरले’ जातोय हेच कळू दिले जात नाही. त्यांना देशभक्तीच्या गोंडस नावाखाली युद्धासाठी तयार केलं जातं. त्यासाठी त्यांच्या डोक्यात प्रखर राष्ट्रवाद पेरला जातो आणि प्रखर राष्ट्रवादाचा मार्ग शेवटी युध्दभूमीवरूनच जातो. युद्धभूमीवर मेलेल्या सैनिकांचे उदात्तीकरण करत परमवीर चक्र वगैरे देवून त्यांच्या मरणाचे आदर्श उभे केले जातात. एखादा शेतकरी किंवा सफाई कामगार काम करता करता मेला आणि एखादा सैनिक लढता लढता मेला तर यात तसा गुणात्मक फरक काहीच नसतो. पण शेतकरी किंवा कामगारांना बंदुकीच्या फैर्या झाडून सलामी दिल्या जात नाही.
अमेरिकेला एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ४५% उत्पन्न नुसत्या श्स्रास्रांच्या विक्रीतून मिळते. जगातली युद्धे संपली तर हे उत्पन्न घटून अमेरिकेत आर्थिक मंदी निर्माण होईल. अमेरिकेची मंदी म्हणजेच जागतिक मंदी हे सूत्र एव्हाना सगळ्या जागतिकीकरणात सहभागी राष्ट्रांच्या लक्षात आले असेलच. चीनने पाकिस्तानला एखादे लांब पल्ल्याचे क्षेपनास्र विकले, तर अमेरिका भारताला त्यापेक्षा जास्त किमतीत आणखी लांब पल्ल्याचे क्षेपनास्र विकेल. तेंव्हा ही स्पर्धा अशीच सुरु राहून जगभरातले हे छोटे मोठे युद्धे होतच राहणार आहेत.
हे सगळे आपल्या राजकारण्यांना कळत नाही अशातला भाग नाही, पण जसे लहान मुलांना अंधारात भूतीबाबा असतो तिकडे जायचे नसते अशी भीती घातली जाते तशीच भीती पाकिस्तानविषयी भारतीय जनतेच्या मनात घातली जाते आणि भारताविषयी पाकिस्तानी जनतेच्या मनात. मग अंधारात जाऊन भूतीबाबाचे सर्जिकल स्ट्राईक करने सोपे होते आणि त्या द्वारे किमान पाच वर्ष तरी बिनधोक निवडून येता येते.
प्रा. सुदाम राठोड
(लेखक मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत)