ठाणे | गाव तिथे ग्रंथालय उभारण्याच्या प्रेरणेने मुंबई व ठाणे विभागात काम करणाऱ्या युवकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडुन पुस्तके जमा केली होती. जमलेल्या पुस्तकांचे पहिले ग्रंथालय यापुर्वी बेडीसगाव वांगणी येथे सुरु करण्यात आले होते. नुकतेच दि वात्सल्य फाऊंडेशनच्या ग्रामविकास प्रकल्प झाडघर मुरबाड येथे पुस्तकांचे दुसरे ग्रंथालय सुरु करण्यात आले. यावेळीं वात्सल्य फाऊंडेशनचे महेंद्र पाटील, नम्रता घरत उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा वैशाखैरे येथेही काही पुस्तके देऊन तेथेही छोटे ग्रंथालय यावेळीं सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गाव तिथे ग्रंथालय ही मोहीम युवकांमार्फत संपुर्ण महाराष्ट्रभर चालवली जात आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात चालणाऱ्या ह्या मोहिमेला टीम परिवर्तन कल्याण, साद फाउंडेशन अंबरनाथ, अलका सावली प्रतिष्ठान कल्याण, अंघोळीची गोळी मुंबई, इकोड्रॉईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन कल्याण, सेवक फाउंडेशन व इतर अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांची मदत मिळत आहे.