नवी मुंबई | बेलापूर येथील प्लॉट क्र.५३, सेक्टर १५ मधील स्टार सिटी रेस्टोरंट आणि बार गेल्या तीन ते चार वर्षांपासून विनापरवाना सुरु असल्याची गंभीर बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईने मनपा आयुक्त एन.रामास्वामी यांच्याकडे पुराव्यांसह लक्षात आणून दिली होती व सदर रेस्टोरंट बार तात्काळ सील करण्याची मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली होती. यासंदर्भात मनसेच्या मागणीनुसार काल दि.२७ मार्च २०१८ रोजी सदर स्टार सिटी बारला मनपा प्रशासनाने सील ठोकले.
आज अतिरिक्त आयुक्तांना भेटून शहर अध्यक्ष गजानन काळे व सचिव संदीप गलुगडे यांनी नवी मुंबईतील अनधिकृत हॉटेल, रेस्टोरंट व बारवर विभाग अधिकारी फक्त जुजबी कारवाई करत आहेत व त्यावर बत्तीस दिवसांत गुन्हा दाखल होत नाही किंवा त्या गोष्टी निष्कासित होत नाहीत अशा अनेक बाबींची यादी अतिरिक्त आयुक्तांना दिली. शासकीय कर्मचारी दफ्तर दिरंगाई कायदा २००५ अंतर्गत संबंधित विभाग अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी मनसेने याप्रसंगी केली. अन्यथा दि.१६ एप्रिल २०१८ रोजी कुंभकर्णाच्या प्रतिमा अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त अतिक्रमण यांच्या दालनात लावण्यात येतील असा इशारा याप्रसंगी मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी दिला.
कमला मिल कंपाउंड सारखी एखादी दुर्दैवी घटना नवी मुंबई शहरात घडू नये यासाठी मनसे स्वतः शहरातील अनधिकृत व विनापरवाना हॉटेल, रेस्टोरंट व बारबाबत माहित जमा करून आयुक्तांना देणार असून यावर मनपा तर्फे कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे रोजगार विभागाचे नितीन चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.