१० पैकी ७ दारू सोडलेल्या लोकांना एक वर्षानंतर का होईना दारू प्यावीशी वाटते…
ज्यांनी कोणी डाएट करून वजन कमी केलेलं आहे त्यांचं वजन वर्षात पूर्ववत होत…
सकाळी उठल्याबरोबर १५ मिनिटांच्या आत आपण मोबाइल हातात घेतो…
“जुन्या सवयी लवकर मरत नसतात” अशी एक म्हण आपणा सर्वांना माहीत आहे.वरील उदाहरणे बारकाईने अभ्यासल्या तर एक गोष्ट जाणवून येते की हा सवयींचा परिणाम आहे. काही वाईट सवयी लवकर सुटत नाही, तर चांगल्या सवयी लवकर जडत नाही. या सवयी अर्थातच मेंदू कार्य करण्याच्या पद्धतीमुळे आपणास जडतात. मानवी मेंदूला कोणती सवय वाईट किंवा कोणती चांगली हे कळत नसत, परंतु ती किती मेंदूला सुखदायी वाटते त्यावरून ती जास्त काळ टिकते. याच गोष्टींचा अभ्यास करून काही लोक जगाच्या एका कोपऱ्यात बसलेली आहेत ज्या तुमच्या सवयींचा व वर्तणुकीचा अभ्यास करून तुम्हाला काय हवं किंवा नाही ते पाहतात. सुरुवातीला संशोधन करून, तुमची माहिती मिळवून तिचं एकत्रीकरण करून त्यातून निष्कर्ष काढून तुम्हाला गुंतवून ठेवतात. याच उदाहरण घ्यायच झालं तर “कँडी क्रश”सारख्या असंख्य गेमची “प्ले स्टोर”वर रेलचेल आहे. जशा जशा गेमच्या पुढच्या पायऱ्या वाढत जातात तसतसं मेंदूला मिळत जाणाऱ्या सुखकारक अनुभूतीच्या लाटा वाढत जातात आणि तुम्ही त्यात गुंतले जातात. मागे “ब्लुव्हेल” नावाच्या गेमने असाच कहर केला होता हे आपणास माहीतच आहे. या गेमच्या माध्यमातून एक तर पैसा कमावणे किंवा तुमची माहिती गोळा करून ती इतर कामांसाठी उपयोगात आणणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. या गेमच्या आकर्षणात आपला पाय खोलवर बुडत जातो. लहान मुलांमध्ये तर हे गेमचं आकर्षण जरा जास्तच असत, कारण त्यांना हे आपल्यासाठी वाईट आहे हे समजण्याची बुज आलेली नसते. म्हणून प्रत्येक पालक आजकाल तक्रार करत असतो, “अहो! हा मोबाईल सोडतच नाही, तासनतास गेम खेळत असतो.”
असाच प्रकार आपण सोशल मीडियावर पण पाहत असतो, ज्यामध्ये फेसबुक, व्हाट्सअप्प, किंवा युट्यूब यांची नोटिफिकेशन आपणांस दर मिनिटांस मिळत राहतात. त्यामुळे अस नोटिफिकेशन दिसलं की आपण लगेच ऑनलाईन जाऊन त्याबद्दल माहिती घेतो. पण माहिती घेऊन आपण शांत बसत नाही तर इतर ही बरीच माहिती तिथं असल्याने आपण सोशल मीडियावर तासनतास घालवतो. मग एकदा या गोष्टींचं सवयीत रूपांतर झालं की मग आपल्याला रहावत नाही, कारण मेंदूला लागलेली या व्यसनांची आस आपल्याला शांत बसू देत नाही. जितकी एखादी गोष्ट तुम्ही वारंवार कराल तितकं तुम्ही लवकर सवयींच्या व्यसनात फसत जाल. वारंवार कोणतीही कृती करण्यावर आपली सवय अवलंबून असते, मग जर तुम्हाला चांगली सवय लावायची असेल तर वारंवार ती गोष्ट केल्याने तशी सवय आपल्याला लागू शकते. मग तो चांगला आहार असो, व्यायाम असो किंवा चांगले विचार. मग मिळणार काय? तर परिणामही तसेच मिळतील…चांगले. जर याविरोधी सवयी असतील तर हानी होणार हेही तितकंच खरं.
कोणतीही कृती माणूस दोन गोष्टींसाठी करत असतो एक म्हणजे आनंद मिळविण्यासाठी आणि दुसरं म्हणजे दुःख किंवा त्रासापासून दूर राहण्यासाठी. बऱ्याच सवयी याच दोन मुद्द्यावर आधारलेल्या तुम्हांला पाहायला मिळतील. सवयी लागण हे काही सहजासहजी घडून येत नाही, त्यासाठी विशिष्ट काळ जावा लागतो. उदाहरणादाखल तुम्ही कालपर्यंत न खाणारी किंवा पिणारी एखादी गोष्ट आज तुम्हाला का आवडते? याच उत्तर जर तुम्ही शोधाल तर समजून येईल की कोणतीही गोष्ट सवय लागण्याआधी तेवढी आवडत नसते परंतु जसजसा आपला वापर वाढत जातो किंवा उपयोग वाढत जातो तसतसं ती गोष्ट, वस्तू, अन्नपदार्थ आपल्याला आवडायला लागतो. हीच गोष्ट तुम्हाला लागलेल्या सोशल मीडियाच्या व्यसनालाही कारणीभूत असल्याचं तुम्हाला समजेल. सुरुवातीस काही वेळेकरता सुरू केलेली एखादी गोष्ट काही काळाने आपली आवड बनून जाते, इतकी की ती गोष्ट न केल्यास मनात अस्वस्थता दाटायला सुरुवात होते. मग ते तंबाखूच व्यसन असो किंवा फेसबुकचं व्यसन असो. ही व्यसन कशी जडतात तर त्याला कारणीभूत आपला मेंदू आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी मेंदूला ऊर्जा लागते. जर तिचं गोष्ट तुम्हाला वारंवार करायची असेल तर मेंदू त्याकरिता सोपा मार्ग म्हणून त्या गोष्टीची सवय लागण्यासाठी विशिष्ट पद्धतीने जोडण्या तयार करतो. या मेंदूत तयार झालेल्या जोडण्या आपल्या सवयी बनून जातात. आपण रोज सकाळी दात घासतो, आंघोळ करतो या रोज लागलेल्या सवयी आपोआप घडत राहतात कारण आपण मेंदूला तशा पद्धतीने प्रशिक्षण देतो. हळूहळू ती सवय बनून गेल्याने या गोष्टी ध्यानात ठेवण्यासाठी मेंदूला विशिष्ट कष्ट घ्यावे लागत नाही.
अशा किती गोष्टी आपण या माध्यमातून शिकून सवयी लावून घेऊ शकतो. चांगल्या सवयी जस की पेपरवाचन किंवा पुस्तक वाचन यांची हळूहळू आपण स्वतःला सवय लावली तर त्यात हळूहळू पारंगत होत गेल्याने एक वेळ अशी येते की आपल्याला कोणीही सांगण्याची गरज पडत नाही की आपण वाचावं म्हणून. सवयी चांगल्या लागल्या तर चांगली गोष्ट पण वाईट लागल्या तर मात्र त्या मोडणं सोप्प काम नाही, कारण त्या सवयीविरोधात कार्य करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, तेही सातत्याने. दिवसभरात पार पाडल्या जाणाऱ्या क्रियांमध्ये जवळपास 40% आपल्या सवयी कार्यरत असतात, हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते खरं आहे.
डॉ.कृष्णा सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)