“मला समजते रे तुझी भूमिका पण कधी कधी अस होत ना की समजत नाही काय करावं, नुसत चक्रीवादळ उठत डोक्यात”, ती म्हणते.
तो शांतपणे तीच म्हणणं ऐकून घेतो, तिचं बोलणं पूर्ण होऊ देण्याची वाट पाहतो..
“काय माहित पण तुझ्यावर माझं खुप प्रेम पण आहे आणि तू आयुष्यभरासाठी मला हवा पण आहेस” ….पण मग हे असे विचार कधी कधी डोक्यात का बरं घोळ घालत असतील?…
क्षणभर वाटत मी माझ्या आईवडिलांना फसवतेय, मला काहीच हक्क नाही त्यांच्या पाठीमागे अस तुझ्याबरोबर फिरायला, तर दुसऱ्या क्षणात माझं मन म्हणत त्यात काय? प्रेम तर आहे ना, मग घरी सांगू रीतसर परवानगी घेऊन लग्न करू. होईल त्रास सुरुवातीला थोडा पण समजावून सांगितल्यावर सगळं होईल मनासारखं अस पण वाटत राहतं. सांग बर अस का होत असेल. तुझ्यासारखं मला का बरं ठाम राहता येत नसेल?
या मनाचा घोळच कळत नाही, कळत पण वळत नाही रे…!
तो मात्र तसा मानसशास्त्रात पारंगत असतो, त्याला हे मेंदूचे खेळ आणि निसर्गाने मेंदूत तयार केलेल्या रसायनांची किमया माहीत असते. थोडा धीर धरून तो बोलतो. हे बघ हे मन म्हणजे दुसर तिसरं काही नसून आपल्या मेंदूत असणारी 2 वेगवेगळी केंद्र आहेत जी कधी कधी एकमेकांच्या हातात हात घालून चालतात तर कधी एकमेकांच्या विरोधात ठाकतात. मग चांगली चांगली माणस पण बिथरल्यासारखी करायला लागतात.
समज एक मन जे असत ते असत भावनिक तर दुसरं असत विचार करणार विवेकी मन. भावनिक मनाची प्रतिक्रिया एकदम लगेच उमटते म्हणजे आपल्याला कोणी वेडंवाकडं बोललं की आपण रागाने लालबुंद होतो तर विचार करणार मन लगेच प्रतिक्रिया देत नाही ते विचार करत, थोडा अवकाश थांबत आणि मग निर्णयाप्रत येत.
तुझ्याबाबतीत पण असच घडतंय तुझं भावनिक मन एकदा उचंबळून आलं की तुला माझं प्रेम प्रकर्षाने जाणवतं, तुला मी हवाहवासा वाटतो, दुरावा नकोसा वाटतो. तू एखाद्या हरिणीसारखी व्याकुळ होतेस. तुझ्या भावनांची लाट सगळीकडे रोरावत आवाज करते. याचा विशिष्ट कालावधी संपला की काही मेंदूतल्या रसायनांच्या बदलाने तुझा मुड बदलला की तू मग विवेकी विचार करायला लागते, स्वतःला प्रश्न विचारून भंडावून सोडते मग आपण जे अगोदर विचार करत होतो ते चुकीचे होते अस तुला वाटायला लागतं आणि मग तू या विचाराच्या चक्रात पार भिंगरीसारखी फिरते.
अगदी या दोघांसारखीच प्रत्येक स्त्री पुरुषांची मानसिक घुसमट होत असते. आपण चुकतोय हे कळत असून पण आपण त्याच चुका वारंवार करत असतो. आजूबाजूचं वातावरण, मनाचा समजूतदारपणा आणि आहार या सगळ्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. भावनेच्या भरात कधी खूपच वाहवत जातो तर कधी विचार करून करून खूपच निरस जीवन जगतो. योग्य वेळी योग्य प्रतिसाद द्यायला आपण कमी पडतो त्यामुळे बरेचसे वाद होत राहतात. त्यात प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, लहानपणापासून झालेली जडणघडण वेगळी असते.त्यामुळे प्रत्येकाचे निष्कर्ष एकाच गोष्टीबाबत वेगवेगळे असतात.शेवटपर्यंत एक वाक्य मात्र आपलं तोंडपाठ होत आणि ते म्हणजे…
कळत पण वळत नाही!?
(हिंदी चित्रपटात हिरो “ज्यावेळी मैं दिलोदिमाग से काम करता हूं” अस म्हणतो म्हणजे याचा अर्थ त्याचा दोन्ही मनावर ताबा आहे असं म्हणायला हवं)
डॉ. कृष्णा सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)