मुंबई | आजही आपल्या आजूबाजूला असलेल्या दुर्गम आदिवासी पाडे दुर्लक्षित आहेत मुलभूत गरजांची पूर्ततादेखील अनेक ठिकाणी झालेली दिसत नाही अशा ठिकाणी मदत पोहचवण्याच्या उद्देशाने कल्याण आणि प्रामुख्याने समाजकार्याचे शिक्षण घेणारी ठाणे आणि मुंबई शहरांतील युवक मंडळी सरसावली आणि आदिवासी परिसरात कपडे वाटपाची मोठी मोहीम सुरू झाली. या युवकांनी प्रामुख्याने सोशल मिडीयाच्या माध्यमाने नागरिकांना आपल्याकडील वापरात नसलेले कपडे देण्याचे आवाहन केले आणि या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला. टीम परिवर्तन, अंघोळीची गोळी, इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन, अलका सावली प्रतिष्ठान त्याचबरोबर गाव तिथे ग्रंथालय या अनेक सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांनी या मोहिमेसाठी आपले योगदान दिले. आपल्या शिक्षण आणि नोकरीचा योग्य समन्वय साधून ह्या युवक मंडळीने दोन दिवसात वांगणी आणि टिटवाळा परिसरातील आदिवासी पाडे आणि वीटभट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात कपडे वाटप मोहीम राबवली. वांगणी परिसरातील दात्रीची वाडी, धारूळ वाडी, वाऱ्याची वाडी, खुरोंडे वाडी तसेच टिटवाळा परिसरातील हिरावाडी, म्हसकळची खालची वाडी, दहिवली आणि घोटसई येथील वीटभट्टीवर कपडे वाटप केले.
साध्या मुलभूत सोयी सुविधाही न पोहचलेल्या या दुर्गम आणि अविकसित अशा पाड्यात कपडे वाटपाची मोहीम राबवण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी दळणवळणाच्या सोयी आणि पाण्याच्या गंभीर प्रश्नांवर काम करण्यासाठी यापुढें आमचा मानस आहे समाजासाठी आपले योगदान देण्याच्या या छोट्या मोहिमेत नागरिकांनी यापुढें देखील सहकार्य करावे असे अविनाश पाटील यानें यावेळीं सांगितले. आपल्याकडील वापरात नसलेल्या सायकली आणि शैक्षणिक साहित्य पोहचवण्याचे देखील आवाहन यावेळीं या युवकांनी केले.