दुपारचं रणरणत्या उन्हात चार पावलं चालवेनाशी झालेली, घशाला कोरड पडलेली.जीव आता जातो की थोड्या वेळाने असं झालेलं. उन्हाचा अंगार जसा अंगावर बरसायला लागला तसा मी घामाने डबडबत होतो. सगळ्या शरीराची लाही लाही होत होती आणि मला एक वाळवंटात सापडावा तसा थंड पाण्याचा झरा सापडला. क्षणभर गुंगून गेलो कारण ते हास्य खूप मोहक होत.
३ वर्षाची एक परी रस्त्याच्या कडेला बसून सगळ्याकडे बघायचीं नी गोड हसायची.तिचेआई वडील कामात गुंगलेले. मळकट, घाणेरडे कपडे, अंगावर ओघळ. पण जीवनाचं न्यार संगीत तिथं ऐकायला मिळालं. खर तर तिच्या कोणीच ओळखीचं नव्हतं तरी त्या रणरणत्या उन्हात सगळ्यांकडून बघून बाळसेदार हास्य ती करायची. मनात म्हटलं वा! क्या बात है.
जगाकडे बघत ती परमोच्च सुख अनुभवत होती आणि मला क्षणभर आपल्या माणुसपणाची लाज वाटत होती. आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंदी राहण्यासाठी काही कारण लागतात, हे पाहिजे, ते पाहिजे. किती तरी भौतिक सुख मिळाली तरी माणूस सुखी नसतोच मुळात कारण आनंदी असणं ही भावना मनात उगम पावते. त्यासाठी गरीब श्रीमंत असणं महत्वाच नसत तर जे आपल्या भोवती आहे ते गोड मानून समाधान मानानं महत्वाचं. आहे तो क्षण भरभरून जगणं, सकारात्मक विचारांची ढाल बनवणं, जीवनाकडे डोळसपणे बघण आणि जीवन समरसून जगणं हे प्रत्येकाला करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता आलां पाहिजे.
हीच गोष्ट त्या छोट्या पिल्लाच्या डोळ्यात मला बघायला मिळाली, जगण्याची आणि आनंदी राहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती…
डॉ.कृष्णा सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)