विदर्भ महाराष्ट्रातील सर्वात जास्त वाघाची संख्या असणारा प्रदेश. त्यातल्यात्यात पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात घनदाट जंगले आहेत. काळकुट्ट अंधार, भयान मध्यरात्र अश्या भयान परिस्थितीत एक भयानक घटना घडली. आपल्या शेळीचं आवाज ऐकून रुपाली मेश्राम ही तरुणी दार उघडून घराबाहेर पडली. बघते तर शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. बाजूला नजर फिरवताना पुढे उभा होता जंगलाचा राजा अर्थातच वाघ. वाघाने क्षणभरही वेळ न दवडता रुपालीवर हल्ला चडवला. संपूर्ण शरीर रक्तमय झालेल्या रुपालीने न घाबरता वाघाचा सामना केला. रुपालीच्या आईने वाघाला काठीने मारले असता वाघाने रुपालीच्या आईवर हल्ला चढवला. रुपाली निर्भीडपणे पुन्हा काठी उचलून वाघाला दबडदबड मारले. त्यामुळे वाघाने घाबरुन पळ काढला. ही कुठल्या कादंबरीतील कथा नसून २१ वर्षीय रुपाली मेश्राम हिची शौर्यगाथा आहे. या घटनेमुळे रुपाली गंभीर जखमी झाली असून रुपालीची आई स्वस्थ आहे. रुपालीवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहे.
२४ मार्च २०१८ च्या मध्यरात्री ही घटना घडली होती. रुपाली आजही निर्भीडपणे सांगते. या अपघाताने मेश्राम कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक कमकुवत झाले. वैद्यकीय उपचारासाठी प्रचंड पैसा लागला. रुपालीच्या आईने सर्वच सोन्याचे दागिने विकून आपल्या मुलीचं उपचार केला. मात्र अद्यापही या जखमी कुटुंबाला शासनस्तरावर कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
– रवी चव्हाण