माणसांच्या गराड्यात
आपण आणि आपलं एकटेपण अदृश्य अंथरलेल
ते बोलत राहत एकटेपणाची भाषा
एकटेपणाच्या लिपीत
म्हणून खपत नाही एकटेपण
कोणत्याच दुकानात
गिऱ्हाईकांच्या कमतरतेमुळे
सोसावं लागत
भोगाव लागत
एकटेपण ज्याच त्याच ज्यानी त्यानी
खूणगाठही बांधावी मनाशी
भेटेलच ते रस्त्यारस्त्यांनी
कधी सावकाश येईल
कधी अचानक झडप घालील
कधी त्याची पावलं ओळखता येणार नाहीत
एकटेपण स्वतःवर चालवलेली धारधार तलवार
एकटेपण असतं जमीन आकाशाला समांतर
एकटेपण भूत भविष्य आणि वर्तमान व्यापून असतं
एकटेपण कुरतडत राहत आत्म्याच द्वार
एकटेपण खोडकिडीसारखं पोखरीत जातं आतल्याआत
एकटेपण अर्धांगवायू झालेल्या अवयवांसारखं
असूनही व्यक्त न करता येणार
डोळे असूनही
आंधळ्याची भूमिका मिरवायला लावणार
अंधाराच्या खोल गर्भात दडून बसलेलं
दातखिळ्या बसून मूक झालेलं
येणारा प्रत्येक श्वास एकटा असतो
तसाच जाणारा देखील
पृथ्वीवर अवतार घेणं
अंतर्धान पावन एकटेपणाची निशनीच
म्हणून कुरवाळायला हवं एकटेपण
तसच वाढवायलाही हवं एकटेपण
चार दोघांची संगत मिळाली म्हणून म्हणू नये
एकटे नाही आहोत आपण
कधी तरी एक दिवस डसणारच असत एकटेपण
नागासारखं फणा काढून
डॉ. कृष्णा सपाटे
(कवी द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)