यवतमाळ | घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी आत्महत्या केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत मध्यस्थी करताना स्व. चायरे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भात दिलेले वचन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज पूर्ण केले. ना. संजय राठोड यांनी यवतमाळ येथे आपल्या निवासस्थानी आज सकाळी स्व. शंकर चायरे यांच्या पत्नी अल्का आणि मुलगी भाग्यश्री यांना रोख एक लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य करून साडीचोळी भेट दिली. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार, पावनी कल्यमवार, विनोद खोडे, पंचायत समिती सदस्य सुहास पारवेकर, रूपेश कल्यमवार, युवासेना उपजिल्हा प्रमुख अंकूश ठाकरे, बेबीताई शेंद्रे, राधा सिंग, विश्वास निकम, रमेश भुरे आदी उपस्थित होते.
शेतकरी शंकर चायरे यांनी १० एप्रिल रोजी केंद्र सरकारला जबाबदार धरून आत्महत्या केली होती. त्यानंतर शंकर चायरे यांची मुलगी जयश्री हिने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून चायरे कुटुंबियांची समजूत घातली. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून चायरे कुटुंबियांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा विश्वास दिला. शंकर चायरे यांच्या मुली जयश्री, भाग्यश्री, धनश्री आणि मुलगा आकाश यांच्या शिक्षणासाठी वैयक्तिक एक लाख रूपयांची मदत करण्याची ग्वाही यावेळी ना. संजय राठोड यांनी दिली. ना. संजय राठोड यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कुटुंबियांनी शंकर चायरे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील सोपस्कार पार पाडले.
ना. संजय राठोड यांनी जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांना सूचना करून चायरे कुटुंबियांना आज यवतमाळ येथे आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. शंकर चायरे यांच्या पत्नी अल्का व मुलगी भाग्यश्री यांच्याशी चर्चा करून शब्द दिल्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी रोख मदत देत असल्याचे सांगितले. ना. संजय राठोड यांनी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या उपस्थितीत ही मदत चायरे कुटुंबियाच्या सुपूर्द केली. घडायची घटना घडली परंतु आता चारही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे, असे अल्का चायरे यांनी यावेळी सांगितले.