लहानपणापासून आई आणि आमच्यात भाज्या खाण्यावरून चांगलच जुंपायचं. सगळ्या भाज्या खाणं निरोगी राहण्यासाठी कसं गरजेचं असतं ह्याचे धडे सगळ्यांनाच जवळपास रोजच मिळत असतात. मोठं झालं म्हणजे लक्षातही येत की खरंच भाज्या विशेषतः हिरव्या भाज्या शरीरासाठी खरंच महत्वाच्या असतात. आणि आपणही त्या खायला सुरुवात करतो.ह्याच पालेभाज्या जर जीवघेण्या ठरू लागल्या तर!
आज मुंबई आणि तिच्या उपनागरांमध्ये हाच विरोधाभास आपण सगळे अनुभवतो आहोत. भाजीवाल्यांकडे, बाजारात टवटवीत आणि हिरव्यागार दिसणाऱ्या पालेभाज्या मुंबईत कुठे पिकवल्या जातात हे शोधायला गेलं तर मात्र खूप जण ह्या भाज्याच खरेदी करणार नाहीत! लोकल ने प्रवास करताना आपल्याला रेल्वे रुळांच्या बाजूला जी लहान लहान शेतं दिसतात तिथं पिकतात ह्या भाज्या, ज्यांना पाणीपुरवठा केला जातो त्याच्याच बाजुला असलेल्या गटाराच्या असंस्कारित पाण्यातून.
सांडपाणी शेतीसाठी वापरण्यात काहिच गैर नसते उलट त्यामुळे सेंद्रिय पदार्थ पिकाला मिळत असतात पण मुंबईसारख्या शहरात जिथे गटाराच्या पाण्यात अनेक प्रकारची रसायने आणि आरोग्याला अहितकारक पदार्थ मिसळलेले असतात कोणत्याही प्रक्रियेविना ते पाणी पिकाला वापरणे म्हणजे सामान्य माणसांच्या आरोग्याशी केलेली हेळसांड आहे.
त्या शेतकऱ्याने काहीच पर्याय नाही म्हणून गटाराचं पाणी वापरायचं आणि ग्राहक म्हणून आपण ते खरेदी करावं का? जबाबदार प्रशासन म्हणून मुंबई जर अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रक्रिया केलेलं पाणी आणि ग्राहकांना निरोगी भाजीपलाही देऊ शकत नाही का?
तुषार वारंग
(लेखन सामाजिक कार्यकर्ते आहेत)