मुंबई | राज्यात अतिजोखमीच्या रुग्णांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत दिली जाते. आतापर्यंत गेल्या पाच महिन्यामध्ये ४१ हजार गरोदर मातांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत देण्यात आली असून त्या व्यतिरिक्त मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या ९ हजार आणि आरोग्य कर्मचारी अशा एकूण ५४ हजार व्यक्तींना ही लस देण्यात आली आहे. साधारणत: मार्च ते मे या काळात स्वाईन फ्लू लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यासाठी ही लसीकरण मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.
सध्या राज्यात बाधित रुग्णांची संख्या केवळ ३१ असून साधारणत: दररोज ८ हजारपेक्षा अधिक रुग्णांची राज्यभर तपासणी केली जात आहे. राज्यात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नसल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली आहे.