देशभर विखुरलेल्या बंजारा समाजाला एका छत्राखाली आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी १९५२ रोजी मोठी परिषद भरवून लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय बंजारा सेवा संघाची स्थापना केली. कालांतराने अर्थातच ९० च्या दशकात रणजीत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या संघटनेचे नामांतर होवून ऑल इंडिया बंजारा सेवा संघ झाले. सद्यस्थितीला समाजात शेकडो संघटनेचा जन्म झालाय. काही अश्या संघटना आहेत की त्यात संस्थापक अध्यक्ष सचिव आणि सभासद हे सारे पदं एकाच नावाच्या अवतीभवती फिरताना दिसते. कारण या संघटनेत फक्त एकच व्यक्ती आहे. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे काहींनी तर चक्क व्हाट्स अॅप संघटना चालवायला घेतल्या आहेत.
अतुलनीय व्यक्तीमत्व असलेले अमरसिंग तिलावत यांच्या रुपाने संघाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक अष्टपैलू राजनेता, विचारवंत, हाडाचा सामाजिक कार्यकर्ता लाभला आहे. आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या तिलावत यांनी त्यांच्या तरुण वयापासून समाजिक कार्याची आवड होती. त्यात प्रामुख्याने बंजारा समाजावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. समाजाच्या पुनरुत्थानासाठी समाजोपयोगी धोरणही त्यांनी आखली आहेत.
आजवर या संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजहिताचे कामे झालीत. या संघटनेच्या स्थापनेमुळे दाक्षिणात्य भारतातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ अश्या राज्यात सामाजिक कार्याची जाण निर्माण होवून समाज प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आला, यांचे पूर्ण श्रेय सेवा संघालाच द्यावे लागेल. उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश या प्रदेशातील बंजारा समाजाला न्याय देण्याचे कामही आॅल इंडिया बंजारा सेवा संघाने केले. यात तिळमात्रही शंका नाही. मात्र, शोकांतिका एका गोष्टीची आहे ती म्हणजे ज्या पद्धतीने समाजाची संघटनात्मक साखळी तयार व्हायला हवी होती ती झाली नाही. राजू नाईक यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अनेक धोरणात्मक समाजहिताचे कार्यक्रम झालीत. मात्र त्यांना समाजात सलोखा निर्माण करता आले नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने संघटनात्मक बांधणी व्हायला हवी तशी झाली नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर राजू नाईक यांची कारकीर्द चांगली होती पण ती अधिकाधिक बळकटही होवू शकली असती.
जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत असलेल्या ९ कोटी बंजारा समाजाचे नेतृत्व करत असतांना राजकारणात प्रवीण असलेल्या अमरसिंग तिलावत यांना समाजकारण करत असतांना अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने लक्षात ठेवून कामे करायला हवीत. जेणेकरून संघटनात्मक बांधणी मजबूत होऊन समाजाची प्रगती होईल. तुर्तास तिलावात यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा