कोणत्याही गोष्टीचं गरजेपेक्षा जास्त ओझं घेतलं की हळव्या माणसाच्या मनाला त्या गोष्टी एखाद्या आळीप्रमाणे पोखरत जातात. मग सुरु होतो जीवघेणा खेळ. काही कर्तव्य करून दाखवायच्या वयात मानसिक आजाराचे ढग गडद झाले की आईबापांच्या कष्टाची माती होते. ज्या वयात मुलांचा आधार मिळायला हवा त्या वयात त्यांनाच हाताला धरून चालायला लावणं म्हणजे एखादं चक्रव्यूह भेदल्यासारखंच.
जीवनाबाबतच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यात आलेलं अपयश माणसाला नैराश्याच्या खाईत लोटत. शरीर आजारी झालं तर वरून दिसत तरी, पण मन आजारी झालं तर ते कोणाला कसं समजणार? हा यक्षप्रश्न घेऊन किती तरी मनोयात्री गलबलत राहतात प्रत्येक घरात. आजच एका अशा तरुण मुलीचे वडील त्यांचा अनुभव मला सांगत होते त्यावेळी, पायाखालची जमीन हळूहळू सरकतेय आणि आपण खोल काळोखी अंधारात पडलोय, ज्यातून परतायचे दोर आपल्या हातात नाहीयेत अस वाटतं होत. काय पद्धतीचं जीवन त्यांच्या वाट्याला आलंय याची कल्पना करवत नव्हती.
असे लाखोंनी आईवडील त्यांच्या मुलांची आयुष्य सुरळीत होण्याची वाट पाहतायेत, फुलांच्या बागा नव्याने उमलून येतील याची वाट पाहतायेत आणि त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या दवाखान्याचे उंबरठे झिजवतातयेत. कधी तरी नवी प्रफुल्लित सकाळ उगवेल एवढीच त्यांची माफक अपेक्षा. मागे लोकसत्ता चतुरंगमध्ये एका मानसोपचार तज्ज्ञांचा लेख आला होता त्यात त्यांनी एका मनोरुग्णाच अनुभवकथन केलं होतं. गेली 25 वर्षे सिझोफ्रेनिया असलेल्या पत्नीला तिचा पती झेलत होता, तिची शुश्रूषा करत होतो. पण त्या गोष्टीच त्याला कधी ओझं वाटलं नाही. ज्या ठिकाणी वेगवेगळी नाती 2-3 वर्षात डोईजड होतात, रंग दाखवतात, तिथं हा माणूस 25 वर्ष काळजी घेतो ते पण कोणत्याही अपेक्षेविना, कल्पनाच करवत नाही. त्या माणसाला त्रिवार सलाम करावासा वाटतो.
डॉ. कृष्णा सपाटे
(लेखन द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)