As the poet Kahlil Gibran put it, “Your pain is the breaking of the shell that encloses your understanding.”
आपत्ती, संकट, शारीरिक आणि मानसिक दुःख आयुष्यातील सर्वात मोठा धडा आपल्याला देऊन जातात. त्यावेळी आपण खर डोळस होतो, रोजच्या जगण्यात संघर्ष करावा लागला नसता, त्रास सहन करावा लागला नसता तर माणसाने काहीच शिकलं नसत. तो तसाच आडमुठा व न प्रगती करणारा राहिला असता. आयुष्यात येणारी संकट माणसाला त्या त्या वेळी होरपळून काढतात, आपण तावून सुलाखून निघतो, तिथंच आपला खरा कस लागतो. एकदा का अशा संकटातून आपण बाहेर पडलो की मग संघर्षाचा अनुभव कायमस्वरूपी मेंदूवर कोरला जातो. परत परत तीच चूक करण्यापासून आपण स्वतःला वाचवतो कारण आपले पाय भाजलेले असतात. त्यामुळे येणार प्रत्येक संकट आपल्याला काही तरी देऊन जात, फक्त ते आल्यावर पाय खंबीरपणे स्थिर ठेवून वाटचाल करण्यात माणसाच्या आयुष्याचा केवढा आनंद एकवटलेला आहे.
“हा ही क्षण निघून जाईल”
हे वाक्य तुम्ही आनंदात असा नाही तर दुःखात असा, मनाला खंबीरता बहाल करत. कोणीही उतू नये,मातू नये आणि माजू तर मुळीच नये यासाठी हे वाक्य सदा आपल्या मनात लिहून ठेवावं. कोणतीही गोष्ट कधीच शाश्वत नसते, प्रत्येक गोष्ट बदलत असते वेगवेगळ्या रुपात मग ते मानवाचं सुखदुःख देखील असू देत. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य मावळतोच त्याप्रमाणे हळूहळू आपल्या तारुण्याची किरण कधी तरी विरणार आहेत. कितीही शरीराला रंगवलं तरी खरी सुंदरता मनात असते आणि पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते. चंद्र कलेकलेने वाढत जातो तसाच कमीही होतो. अगदी तसंच मानवी जीवनप्रवाह हा पाण्याचा बुडबुडा आहे, कधी तरी तो फुटणारच आहे. त्यामुळे कितीही पैसे कमवणाऱ्याने अस समजू नये आपण अमर आहोत किंवा दुःखी होणार नाही आहोत. तसेच दुःखांचे डोंगर ज्यांच्या मानगुटीवर बसून ज्यांचे छळ करतायेत त्यांनी सुध्दा धीराच टॉनिक लावलं तर थोडी खंबीरता मनात नवं बीज पेरील.
डॉ. कृष्णा सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे प्रतिनिधी आहेत)