संघर्षशील व्यक्तीमत्व, कृषिधर्मी पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने भाजपच नव्हे तर राज्यातील राजकारणात अंधार पसरल्यासारखे वाटत आहे. जेव्हा शेतक-यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले जात नव्हते त्या कठीण काळात खामगाव ते आमगाव शेतकरी दिंडी काढून शेतक-यांच्या प्रश्नांवर वाचा फोडण्याचा काम त्यांनी केले. ज्या काळात भाजपची राज्यात फारशी ताकद नव्हती त्याकाळात शेतक-यांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे पुढे आणून त्याचे नेतृत्व फुंडकरांनी केले. पश्चिम विदर्भात पक्ष वाढविण्यात त्यांचा योगदान विसरता येणार नाही.
घरात राजकारणाचा वारसा नसतांना त्यांनी राजकारणात प्राविण्य मिळवले. विद्यार्थी जीवनात त्यांनी भारतीय विद्यार्थी परिषदचे काम केले. महाविद्यालयीन प्रश्नांवर बेधडकपणे आवाज उठविला. व्यापक जनसंपर्क आणि निर्भीड वृत्तीमुळे ते जनसंघाच्या सावलीत काम करण्याची संधी मिळाली. आणीबाणीच्या कठीण काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
फुंडकर यांनी पहिल्यांदा अकोल्यातील खामगाव विधानसभा निवडणूक जिंकून राजकारणात उडी घेतली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. दोनदा विधानसभेवर, तीनवेळा लोकसभेवर ते निवडूण आले. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद असो वा विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद त्यांनी संयमाने जपली. त्यांच्या अचानक गेल्यामुळे राजकीय क्षेत्रात मात्र कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
रवी चव्हाण
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबईचे मॅनेजिंग एडिटर आहेत)