मुंबई | मुंबई महानगराच्या पाठोपाठ विरार शहर हे अधिक झाडांचा भाग म्हणून ओळखलं जातं. येथेच सर्वात जास्त झाडे आढळतील.पण विकासकामे करताना तेथे अनेक वर्षांपासून बहरत असलेल्या झाडांना खिळे,काँक्रीट, डाम्बर व पेव्हिंग ब्लॉकमध्ये झाडांचा श्वास जखडून टाकलेली उदाहरणे समोर आली आहेत.त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे व्यवसायांचे प्रमाण वाढले आणि मग जाहिरातीसाठी सर्रास झाडांचा वापर होऊ लागला.रस्त्याकडेला असलेली झाडे हि जाहिरात लावण्याचे हमखास ठिकाणं बनली.त्याच झाडांना मोकळा श्वास घेण्यासाठी ‘अंघोळीची गोळी’ गेली तीन महिन्यांपासून खिळेमुक्त झाडे हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवत आहे.
“अंघोळीची गोळी” आणि इतर सामाजिक संस्थांनी राबवलेल्या खिळेमुक्त झाडे या उपक्रमा अंतर्गत सर्व झाडांना प्रथम खिळेमुक्त करून त्यानंतर त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी त्यांच्या भोवती आळे करण्यात येणार आहे.याकामी प्रशासनाची मदत घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंघोळीची गोळी मुंबई टीम ,गुरुमा केयेर्स आणि आरंभ सामाजिक प्रतिष्ठान मार्फत विरार मध्ये खिळे मुक्त झाडे हे अभियान घेण्यात आले. आज ह्या अभियानाअंतर्गत विरार एस. टी. स्टॅन्ड जवळील आणि रेल्वे स्टेशन जवळील ५० झाडांचे जवळपास १५० खिळे आणि तारा काढण्यात आले.
डॉ. गणेश कदम ह्यावेळी म्हणाले कि झाडे हि पुढच्या पिढीसाठी आपल्याकडे दिलेली संपत्ती आहे,पुढच्या पिढीसाठी टी राखून ठेवली पाहिजे.
अंघोळीची गोळी मुंबई टीमचे तुषार वारंग म्हणाले की पुण्यातून सुरु झालेलं हे अभियान आता मुंबईच्या उपनगरात सुद्धा पोहचले आहे आणि आता आपली जबाबदारी आहे की झाडांवर कोणी खिळे आणि बॅनर्स ठोकू नये म्हणून प्रयत्न करणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे.ह्यावेळी नामदेव येडगे म्हणाले ह्या अभियानाला स्वच्छ भारत या अभियानासोबत जोडणार आहे आणि घरा घरात हे अभियान पोहचून झाडांप्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न अंघोळीची गोळीतर्फे करणार आहोत.
विरार वासियांना आवाहन करण्यात येत आहे की खिळेमुक्त झाडे ह्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढे यावे.