मुंबई | शहरांच्या विकासात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे मुंबई शहरातील प्रवाशांसाठी मोबाईलद्वारे इंटिग्रेटेड टिकिटींग प्रणाली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई मेट्रो वनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त वर्सोवा मेट्रो स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई मेट्रो वनची कार्यप्रणाली भविष्यातील अन्य प्रकल्पांनाही मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस केले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्यू-आर कोड आधारित ‘मेट्रो मोबाईल टिकेटींग-स्किप-क्यू’ या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. तसेच माझी मेट्रो फेस्टिव्हलमध्ये पारितोषिक प्राप्त चित्रकृती, कविता आणि छायाचित्रांनी सजविलेल्या ‘माझी मेट्रो आर्ट ट्रेन’ चे उद्घाटन करण्यात आले.