मुंबई | नुकतेच राज्यात प्लास्टिक बंदी कायदा निर्माण करण्यात आलाय त्यामुळे मुंबईसह राज्यभर प्लास्टिक बंदी झाली आहे. प्लास्टिक आणि प्लास्टिकपासून बनलेल्या वस्तू कुठे टाकायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना अनेक नागरिकांना प्लास्टिक कुठे टाकावा हा प्रश्न पडतोय. काळजी करु नका, अंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेमार्फत पाणी आणि पर्यावरण या घटकांवर काम करत खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ‘खिळेमुक्त झाडे’ या उपक्रमाच्या माध्यमातून अंघोळीची गोळी संस्थेचे राज्यभर अभियान चालू आहे.
अशातच, प्लास्टिक वापरावर कायद्याने बंदी आणली. या निर्णयाचे अंघोळीची गोळी संस्थेने स्वागत केले असून यानिमित्ताने ‘प्लास्टिक पिशव्या द्या; बदल्यात रोपटे घ्या’ ह्या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. यामध्ये १०० रोपांचे वाटप करणार असून ५ प्लास्टिक पिशव्यांच्या बदल्यात १ रोपटे देऊन जाणीवजागृती करण्याचा मानस संस्थेचा आहे. आपल्याजवळ असणा-या प्लॅस्टिक पिशव्या देऊन त्या बदल्यात रोपटे घेऊ शकता.
अंघोळीची गोळी संस्थेसह गोरेगाव येथील वसुंधरा ग्रीन क्लब, एस. एस. आणि एल. एस. पाटकर/ वरदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वरील महाविद्यालयात हा उपक्रम येत्या ३० जूनला शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुषार वारंग यांनी केले आहे.
“नुकत्याच झालेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत एका वेगळ्या आणि परिणामकारक अशा उपक्रमातून करत आहोत हा उपक्रम अर्थातच आपल्या सहभागाशिवाय यशस्वी होणं शक्यच नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.”
तुषार वारंग, सामाजिक कार्यकर्ते ९९६९२९४३०२