मुंबई | देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईपासून अवघ्या काही तासाच्या अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी आजही संघर्ष करावा लागतो. हाच संघर्ष कमी करण्याच्या हेतूने आभा परिवर्तनवादी संस्था मागील पाच वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. मागील वर्षांपासून खारीचा वाटा उपक्रम संस्थेने सुरु केला आहे. यंदा या उपक्रमाच्या माध्यमातून खेड, महाड आणि पोलादपूर मधील दहा दुर्गम शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले गेले. गेल्या वर्षी ११० तर यंदा २५० विद्यार्थ्यांना आभाच्या माध्यमातून हा खारीचा वाटा देण्यात आला. आपले मित्र आणि स्वतःचे पैसे अशी निधी जमवून कार्यकर्त्यांनी हे साहित्य संस्थेच्या माध्यमातून मुलांना दिले. फक्त साहित्यचं नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिन्यातून एकदा शाळांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने आणि चर्चासत्र यापुढें संस्थेतर्फे ठेवण्यात येणार आहे.
मुंबईतील ही तरुणांची संघटना सतत विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील असते. ज्याला शक्य आहे त्याने जरी एका विद्यार्थांच्या खर्चाची जबाबदारी उचलली तरी या मुलांच्या यशाचा सुगंध अवघ्या विश्वात दरवळेल अशी खात्री संस्थेचे कार्यकर्ते शशांक भुवड यांनी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात व्यक्त केली.