ठाणे | महाराष्ट्र कृषिदिनाचे औचित्य साधून शहापूर येथील तरुणांनी केली वृक्ष लागवड. पर्यावरणाचा ढासळता ऱ्हास थांबवायचा असेल तर वृक्षारोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वृक्षारोपण ही चळवळ होणे गरजेचे असल्याने शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या निमित्ताने रविवारी शहापूर तालुक्यातील चिंचवली येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेहरू युवा केंद्र ठाणे सलग्नित नवक्रांती मित्र मंडळ दहिवली, श्रावस्ती बहुउद्देशीय संस्था कल्याण, दैवैज्ञ एकता संस्था आदी संस्थांनी एकत्र येत वन विभाग शहापूरच्या दहिवली वनपरिक्षेत्रातील सर्वे नंबर ७९ वर वृक्षारोपण करून ती जगविण्याचा संकल्प केला.
या वेळी एकूण ३७० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यात आकाशी, कांडोल, पेरू, चिंच, करंज, गुलमोहर, आवळा, बांबू अशा वेगवेगल्या प्रकारच्या वृक्ष रोपांचा समावेश होता. वृक्ष लागवड केल्यानंतर त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे. दर महिन्याला लागवड केलेल्या वृक्षरोपांची माहिती घेण्यासाठी आमच्या संस्थेचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे श्रवस्ती संस्थेचे मनोज जाधव यांनी सांगितले. वाढलेल्या रोपांचे संवर्धन करण्यासाठी भविष्यात वनविभागाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दत्तात्रय एस पाटील यांनी सांगितले. एकूण १२० युवक युवतींनी या वृक्षलागवड उपक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी वनविभाग शहापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी एन जी कोकरे, दहिवली वन परिक्षेत्राचे वनपाल आर के धनगर, वनरक्षक डी जी देशेकर, व्ही ए चौधरी व इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्र ठाण्याचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा नवक्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय एस पाटील व वनपाल आर के धनगर यांनी स्वयंस्फूर्तीने विशेष मेहनत घेतली. तसेच श्रवस्ती सामाजिक संस्थेचेे सचिव कपिल खरात, दैवैज्ञ संस्थेचे रोशन क्षिरसागर नवक्रांती मंडळाचे वसंत पाटील, आशुतोष सातपुते, साहिल पाटील, शिवकन्या प्रतिष्ठानच्या सोनम पाटील, पुनम पाटील, कविता पवार आदी युवक युवतींनी नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.