बीड | मराठा आरक्षण मिळावे ही शेवटची इच्छा आहे, अशी चिठ्ठी लिहून शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बीड शहरात काल उघडकीस आली. शहाजी मोहनराव फाटक ४३, रा. जेबा पिंपरी, ता. बीड, ह.मु. गजानन कॉलनी, शाहूनगर, बीड असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
फाटक हे बीड तालुक्यातील वांगी शिवनी येथील संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. सोमवारी पत्नी व मुले बाहेर गेल्यावर घरात कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पत्नी परत आल्यावर तिच्या लक्षात हा प्रकार आला. शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत प्रकरणाची नोंद पोलीस दप्तरी झाली नव्हती.