मुंबई | दहीहंडीच्या दिवशी भाजप आमदार राम कदमने केलेल्या महिलांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबईने आज राम कदमच्या मतदारसंघात घाटकोपर येथे आंदोलन केले. राम कदमच्या फोटोला काळे फासून हे आंदोलन केले गेले.
दहीहंडीचा उत्सव सगळीकडे उत्साहात चालू असतानाच राम कदमने आक्षेपार्ह विधान करून स्त्रीला माता मानणाऱ्या भारतीय संस्कृती आणि सण यांचा अपमान केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील वाचाळवीरांवर लवकरात लवकर कारवाई करावी. राज्य महिला आयोगाने देखील बोटचेपी भूमिका न घेता लवकरात लवकर अशा योग्य ती कार्यवाही करावी, अशी भूमिका अभाविप मुंबई महानगर सहमंत्री स्वाती चौधरी यांनी मांडली.