मुंबई | इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुले हळूहळू मातृभाषेपासून दुरावत चालली आहेत. बालसाहित्य अधिकांश इंग्रजी भाषेतून निर्माण होत आहे. पुढील २० ते ३० वर्षानंतर मुलांना मातृभाषेतून लिहिता आणि वाचता येऊ शकेल की नाही, अशी चिंताजनक परिस्थिती दिसत आहे.
या गोष्टीचा गांभीर्याने विचार व्हावा तसेच भारतीय भाषांमधून अधिक बालसाहित्य निर्माण करावे असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले. उर्दू भाषेतून प्रकाशित होत असलेल्या ‘गुलबुटे’ या लहान मुलांच्या मासिकाच्या पहिल्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.