मुंबई | ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आज ऊसतोड संघटनांच्या प्रतिनिधींना घेवून मुख्यमंत्र्याची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नांवाने स्थापन करण्यात आलेले ऊसतोड कामगारांचे महामंडळ दस-यापूर्वी कार्यान्वित केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आश्वासन दिले.
राज्यात सध्या ऊसतोड कामगारांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी साखर संघाच्या कार्यालयात आ. जयंत पाटील यांच्याबरोबर लवादाची बैठक पार पडली. बैठकीनंतर राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ऊसतोड कामगारांच्या कांही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींना घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली. ऊसतोड कामगारांना पक्की घरे, शौचालय, आरोग्य सुविधा याबरोबरच मजूरांना स्वस्त दरात धान्य वाटप, दारिद्र्य रेषेच्या यादीत त्यांचा समावेश करणे आदी प्रश्न तात्काळ सोडविण्या बाबत आग्रही भूमिका मांडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलतांना सर्व प्रश्न सकारात्मक दृष्टीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आयुष्यभर संघर्ष केला, लढा दिला. सरकारने त्यांच्या नांवाने स्थापन केलेले ऊसतोड महामंडळ हा आमच्या भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे असे सांगून हे महामंडळ तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. जेणेकरून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, त्यासाठी हे महामंडळ लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी ऊसतोड संघटनांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि महामंडळाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. येत्या दस-यापूर्वी ते कार्यान्वित होईल अशी ग्वाही दिली. माजी आमदार केशवराव आंधळे, गोरक्ष रसाळ, बाबासाहेब बांगर, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, रामकृष्ण घुले, जीवन राठोड, आबासाहेब चौगुले, राणा डोईफोडे, रामहरी दराडे, महादेव बडे, संजय तिडके, सुखदेव सानप, सुरेश वनवे, विष्णूपंत जायभाये, तात्यासाहेब हुले, सुधाकर लांब आदींसह विविध ऊसतोड मजूरांच्या संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.