मुंबई | गणेश चतुर्थीला सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालु असते आणि याचं दिवशी कल्याण मधील निलतेजनगर संकुलातील गणपती मंडळात अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेचा बुवाबाजी भांडाफोड हा कार्यक्रम सादर झाला. समाजात कर्मकांड, बुवाबाजी, करणी या अंधश्रद्धा अजूनही चालु आहेत आणि या अंधश्रद्धेला सुशिक्षित लोकही बळी पडू लागले आहेत. ते कुठेतरी थांबावं यासाठी श्रध्दा असावी पण अंधश्रद्धा नसावी ह्या विषयावर महाराष्ट्र अंनिसचे कल्याण शाखेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी जमलेल्या लोकांना मार्गदर्शन केले. विविध चमत्कार सादर करून त्यामागील विज्ञान लोकांना पटवून सांगितले.
पर्यावरणपूरक बाप्पाची मुर्ती बसवावी, निर्माल्याचे योग्य नियोजन करावे, बाप्पाच्या मूर्तीची उंची दर वर्षी न वाढवता ती पर्यावरणपूरक कशी असेल ह्याचा प्रचार, प्रसार करण्याचा व बाप्पाच्या दर्शनाला येताना एक वही एक पेन, पेन्सिल आणण्याचा संदेश देखील यावेळीं स्वप्निल शिरसाठ यांनी श्रोत्यांना दिला. यावेळीं इतर तरुण साथींनी प्रबोधनपर गीते सादर केली, आजच्या विज्ञानयुगात अंधश्रद्धा समूळ नष्ट करणे ही काळाची गरज आहे आणि येणारी पिढी ही अंधश्रद्धामुक्त पिढी असावी आणि जेव्हा अंधश्रद्धा मुक्त भारत होईल तेव्हाच देश हा प्रगती पथावर वाटचाल करू शकतो असा ठाम विश्वास उराशी बाळगून राजेंद्र कोळी, सागर वाळके, रोहित जगताप, अनिकेत चांदूरे, संकेत जाधव, रोहित गोडसे, भुषण राजेशिर्के, अविनाश पाटील ही मंडळी जागोजागी प्रबोधनाचे काम करत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी असे कार्यक्रम सादर करण्याचा आमचा मानस आहे असेही यावेळीं या युवकांनी सांगितले.