मुंबई | ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील लाखो बांधवांसाठी विकासाची पहाट ठरेल. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार असल्याने राज्यातील 90 टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचे कवच मिळणार असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.
झारखंड रांची येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा राष्ट्रव्यापी शुभारंभ करीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.