चितेवरचा माणूस जळताना दिसतो आणि त्याच अस्तित्व नष्ट होत, पण चिंतेत असणारा माणूस धुमसत असतो आतल्या आत, ज्याचा धुरही दिसतं नाही आणि झळयाही दिसत नाहीत इतरांना. चिंता माणसाला पोखरत जाते वाळवी लागल्याप्रमाणे आणि जिवंत असूनही तो आपलं अस्तित्व हरवत जातो. पोराबाळांच्या, बायकोच्या काळजीपासून ते देशाच्या आर्थिक वृद्धीदराची चिंता, शेजारच्या घरातल्या दुःखदारिद्र्यापासून ते जगात घडणाऱ्या युद्धपर्यंतची चिंता, आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपली पाठ अशी धरून असते, जी शरीरात अनावश्यक तणाव निर्माण करते.
जग काय म्हणेल?, लोक काय विचार करत असतील?, मला हे जमेल का?, अशा अनेक गोष्टी ज्यांचं विनाकारण भांडवल करून आपण स्वतःलाच भंडावून सोडतो. ज्या प्रश्नाची उत्तरे आपल्याकडे नसतात, त्यासाठी विनाकारण तेचतेच विचार मनात घोळवत ठेवल्याने, आपली अवस्था बऱ्याचवेळा “इकडे आड तिकडे विहीर” अशी झालेली असते. वास्तवाचा विचार करण्याऐवजी आपण आपल्या चुकीच्या समजुतींना खतपाणी घालत गेलो, की चिंता करकचून आपले पाश आवळते आपल्याभोवती, ज्यामुळे एक न्याराच वैचारिक गोंधळ उडालेला असतो आपला.
ज्या गोष्टींची उत्तर आपल्याला शोधून पण सापडत नाही, अशा गोष्टींची विनाकारण काळजी करण्याने आपण आपला बहुमूल्य वेळ तर वाया घालवतोच, पण चिंता माणसाच्या शरीराची आणि मनाची सारी ताकत शोषून घेते. मग आपण नावाला माणूस म्हणून जगतो शरीराने, पण आत्मा मात्र कधीच हरवलेला असतो. मग अनामिक हृदयाची धडधड व्हायला सुरुवात होते, हातपाय कापायला लागतात, जीव घाबराघुबरा होतो. विचारांच काहूर चक्रीवादळासारखं आपल्याला गरगर फिरवत राहत आणि आपण त्यातच होत्याच नव्हतं होऊन बसतो. सुखी जीवनाचा मार्ग ज्यांना शोधायचा आहे त्यांनी अनावश्यक चितांना कायमची तिलांजली द्यायला हवी, मनात आत्मविश्वासाचा सकारात्मक महामेरू रोवून जे प्रश्न आपल्याला पडतायेत त्यांची उलटतपासणी घ्यायला पाहिजे. मग आपल्या चिंता,काळज्या किती अवास्तव होत्या हे आपल्याला जाणवायला लागेल.
-डॉ.कृष्णा सुभाष सपाटे