मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ममता बॅनर्जी सरकारच्या हुकूमशाही व मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या धोरणाविरोधात आज मुंबईत दादर आणि भांडुप येथे आंदोलन केले. पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथे पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांवर केलेल्या गोळीबारात २ विद्यार्थी मृत्यमुखी पडले. या अमानुष घटनेचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी परिषदेने मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी आंदोलन केले.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथेही २५०० विद्यार्थी विद्यार्थिनींची भव्य रॅली काढून निषेध करण्यात आला. पश्चिम बंगालच्या हुकूमशाही सरकारने पोलिसांच्या मदतीने विद्यार्थी परिषदेचे लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. आंदोलनातील सामान्य विद्यार्थी कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला, तसेच विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री. आशीष चौहान व ६ इतर विद्यार्थी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या सामान्य कार्यकर्त्यांना गुन्हेगराच्या कक्षेत ठेवण्यात आले. ममता सरकारच्या या हुकूमशाहीचा विद्यार्थी परिषद तीव्र शब्दात निषेध करते. या लोकशाही विरोधात चाललेल्या कारवायांचा विद्यार्थी परिषद तीव्र शब्दांत विरोध करते.
अभाविपचे स्पष्ट मत आहे की पश्चिम बंगाल सरकारचे हे अमानुष वर्तन अस्वीकारार्ह आहे. इस्लामपूर येथील घटनेत २ निर्दोष विद्यार्थ्यांचा मृत्यु ममता सरकारचा बंगाली अस्मितेवर हल्लाच आहे. मुंबई अभाविपने दादर येथे केलेल्या निदर्शनात कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या हुकुमशाही विरोधात लढा सुरु ठेवणार असल्याचे, तसेच या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी लावून धरणार असल्याचे यावेळी सांगितले.