लातूर | महाराष्ट्रातील विद्यार्थी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी 1996-97 मध्ये अभावीपने सुरू केलेले राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभासंगम यंदाचे १७ वे वर्ष असून ते २९-३० सप्टेंबर रोजी ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी, दयानंद सभागृह, लातूर येथे संपन्न होत आहे. अमळनेर, रत्नागिरी, पुणे, डोंबिवली, नांदेड, सोलापूर, जळगाव, मुंबई, गोवा, सांगली, परभणी आदी शहरात यापूर्वी हे संमेलन पार पडले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व नामवंत साहित्यिकांची हजेरी यामुळे याचा आलेख वाढतच गेला. यावेळी कथा, कविता, पटकथा, वैचारिक लेख, कथाकथन व ब्लॉग लेखन आदी विषयात विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
दोन दिवसीय संमेलनात दिंडी, जाहीर उदघाटन, महाविद्यालय प्राध्यापक / प्रमुखांचे एकत्रीकरण, नामवंत साहित्यिकांची प्रकट मुलखात, कथा / वैचारिक लेख / पथ नाट्य लेखन – सादरीकरण / अनुदिनी लेख, निवडक विद्यार्थी कवींचे प्रातिनिधिक कविसंमेलन व कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, समारोप / पारितोषिक वितरण अशी कार्यक्रमांची रेलचेल या दोन दिवसात होणार आहे.
या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ कवयित्री डॉ सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते होणार आहे. ‘वाचन संस्कृती’ या विषयावर मुख्य भाषण श्री भूषण गगराणी (प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय) यांचे होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाहीर हेमंतराज मावळे ‘लोककला महाराष्ट्राची’ कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. प्रसिद्ध कवी श्री संदीप खरे यांची प्रकट मुलखात या संमेलनात ऐकायला मिळणार आहे. हे प्रतिभासंगम मराठवाड्यात असल्याने ‘शेती : वास्तवातील व साहित्यातील’ हा परिसंवाद योजिला आहे, या परिसंवादात प्रामुख्याने श्री इंद्रजीत भालेराव उपस्थित राहणार आहेत. नवोदित साहित्यिकांच्या साहित्य प्रकारानुसार मान्यवर साहित्यिकांसोबत गटशः चर्चा या प्रतिभासंगम मध्ये होणार आहेत. प्रतिभासंगम चे पारितोषिक वितरण श्री प्रवीण तरडे ( फर्जंद-देऊळबंद फेम अभिनेते) यांच्या हस्ते होणार आहे. या दोन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनाचा समारोप जेष्ठ पत्रकार व लेखक श्री अरुण करमरकर यांच्या भाषणाने होणार आहे.
तरी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र आयोजित १७ वे राज्यस्तरीय प्रतिभासंगम विद्यार्थी संमेलनात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होवून संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोंकण प्रदेश मंत्री श्री अनिकेत ओव्हाळ, प्रदेश उपाध्यक्ष प्रा अनिल मस्के व प्रतिभासंगम २०१८ निमंत्रक श्री प्रसाद जाधव यांनी केले आहे.