मुंबई | एम्फुकटो संघटनेने दि २४ सप्टेंबर पासून आपल्या मागण्यांसाठी बेमुदत काम बंद संप आंदोलन सुरु केले आहे. प्राध्यापकांच्या समस्यां सरकारने सोडविले पाहिजे यात दुमत नाही. प्राध्यापक संघटना आपल्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार आंदोलन अथवा संपाचा बडगा उगारतात परंतु यात विद्यार्थ्यांच्या शिकवणीवर परिणाम होतो. गेल्या १० दिवसांपासून प्राध्यापक संघटनेने केलेल्या शिकवणी बंदमुळे विद्यार्थ्यांचे योग्य वेळेत वर्गच होत नाहीयेत. प्राध्यापकांच्या संपावर तोडगा काढावा यासाठी अभाविप शिष्टमंडळाने आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.
यादरम्यान अभाविप वारंवार पाठपुरावा करीत असलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरु करण्याचे सरकारने घोषित केले असले तरी अभाविप ती प्रक्रिया त्वरित करण्यासाठी सरकारकडे आग्रही असल्याचे प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले. प्राध्यापक संपातील मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे व यातून मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अभाविप शिष्टमंडळाला दिले.
ऐन परीक्षेच्या काळात सुरू केलेले प्राध्यापक आंदोलन चुकीचे असल्याचे अभाविपचे मत आहे. प्राध्यापकांनी त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सरकारशी कायदेशीर संघर्ष करावा परंतु त्याकरिता विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये व हे आंदोलन त्वरित स्थगित करत शिकवणी सुरू करावेत असे आवाहन ओव्हाळ यांनी प्राध्यापक संघटनेला केले आहे.