‘स्त्री म्हणजे उपभोग्याची एक वस्तू’असाच दृष्टिकोन आज पावलोपावली समाजात जगताना प्रत्येकास जाणवतोय.तिला ‘तू कमजोर आहेस’अशी बतावणी करुन घराघरात पुर्वी होणारा तिचा कोंडमारा शिक्षणाने बव्हंशी कमी झालेला असला तरी,तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र ‘उपभोगाकरता उपयोगी वस्तू’ म्हणुनच राहिला.पोटच्या पोरीची इज्जत बलात्कारी बापाला आज राहिली नाही;खरं तर इथेच माहीती पडतात भविष्यातल्या समाजाच्या पाऊलखुणा; पुढचे काय न बोललेलेच बरे.घरी एक आणि समाजात भलतंच अशी द्वीपक्षी भुमिका राजरोसपणे घेउन कैक गावगुंड कलियुगी द्रौपदीचा भरसमाजात अपमान करताना आपल्याला दिसतात; शहाणथोर माणसे जागेपणी झोपल्याचे सोंग करत तटस्थतेने राहतात.हृदयापासुन प्रेम करणं,तिची इज्जत करणं,सारांश तिच्यात पावित्र्य पाहणं,हे कुठं तरी आज कमीकमी होत चाललंय,ते कुठेतरी थांबलं पाहिजे,वा त्यावर अंकुश लागला पाहिजे,अशाच दृष्टिकोनातून’स्त्री’ह्या चित्रपटाचे कथानक लिहिलं गेलंय.ह्या चित्रपटाचं कथानक जादूटोणा व अंधश्रद्धेभोवती फिरते.,काहींना ते विचित्र वाटेलही,पण ह्याच जादूटोणा-भूतप्रेत व अंधश्रद्धेचा आधार घेऊन कैकजणांच्या कलुषित मनावर भीतीने अंकुश ठेवता येऊ शकतो,असा कल्पनाविचार ह्या चित्रपटाच्या कथानकात मांडलाय.
स्त्री ही आज्ञाधारी व पतिव्रता असल्यावर सुद्धा समाजातल्या निर्घुण लोकांनी तिला पतीपासून तोडून टाकणं; पतीला जीवे मारणं.तिच्या तारुण्यसुलभ स्वप्नांचा खून झाल्यावर,त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने तिचं भटकत राहणं,त्यात रसिकांची जिज्ञासा वाढविण्याकरता थोडं तिखट,मीठ,साखर लावून वाढणं आलंच,ते ह्या चित्रपटात उत्तम साधलय.
आजच्या काळात पुरुष शिक्षण,माहिती तंत्रज्ञान,सभ्यतेने पुढारलेला असला तरी त्याची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी मात्र उन्नत,उद्दात नाहीये हे खरं.दृष्टी अधिकाधिक अवनतीकडे वेगाने चाललीये.लहान मुली काय?घरंदाज स्त्रियां काय?किंवा नवपरिणित वधू काय?किंवा वृद्ध महिला काय? अगदी कुणीच ह्या जीवघेण्या पुरूषी भोगाच्या कचाट्यातून सुटलं नाही. शिकता शिकता ‘साक्षरा’चा कधी राक्षसा(साक्षरा शब्दाची उलटी मांडणी) झाला हे आमचं आम्हालाच कळलं नाही.ह्या अधोगमनाचा अभ्यासही कुणाला करायला सवड नाही; कारण जो तो अधिकाच्या भोगउपजीविकेच्या नादात कार्यमग्न.मग कसा काय आपल्यात उत्कट प्रेमभाव अनुभवास येणार?बहुदा तो न मिळल्यानेच जिवंत थडगी बनून ह्या चंदेरी दुनियेत आपण कुणाची न कुणाची शिकार झालो तरीपण ठिकठिकाणी खोटा टेंभा मिरवत जगल्याचे दाखवत फिरत असतो;त्यापेक्षा ती भूतं परवडली,कारण ती इच्छाधीन- प्रामाणिक(चित्रपटाच्या कथानुषंगाने)तरी असतात;अगदी वर्षानुवर्षे…..
– संतोष राजदेव