सावली होत आहे उन्हासारखी
अन निराशा उरी दाटल्यासारखी
ओळखीचा मला सूर दयावा कुणी
जिंदगी बेसुऱ्या तुणतुण्यासारखी
वाटली गोड दुनिया मला यारहो
पण निघाली खरी ती विषासारखी
काम वृद्धाश्रमांचे कुठे काय मग
वाढवा फक्त मुलगी मुलासारखी
चंद्र तारे नको, ती मिळाया हवी
रात्र होईल माझी सणासारखी
क्षणभराचा तिमिर ना कधी भासतो
एवढी माय जळते दिव्यासारखी
घ्यायची भेट आहेच तर भेट घे
भेट व्हावी परंतू मनासारखी
जीवनाचा करू गोड गुलकंद चल
मी गुळासारखा, तू फुलासारखी,
– एजाज शेख