मुंबई | प्रवासी देवो भव: या ब्रिदवाक्याचा विरारमधील रिक्षाचालकांना विसर पडला आहे. ज्या प्रवाशांच्या भरोशावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्यांच्याशी हुज्जत आणि त्यांच्यावरच अरेरावी करण्यात हे रिक्षाचालक धन्यता मानत असल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
आधीच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना आता तर मागे बसलेल्या प्रवाशांना उठवून काही रिक्षाचालक जबरदस्तीने पुढे बसण्यास भाग पाडत असल्याने प्रवाशांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. घाईगडबडीत आणि कामाला जाण्याच्या वेळात भांडणतंटा नको म्हणून प्रवासी गप्प राहात असल्याने रिक्षाचालक निर्ढावले आहेत. तर प्रवाशांची शिष्टाई आणि नरमाईची भूमिका वाहतूक पोलिसांच्या पथ्यावर पडली असल्याने त्यांच्याकडून अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मंगळवारी दुपारी कारगिलनगर येथील एका रिक्षात सुरुवातीला एक प्रवासी बसला होता. त्यानंतर कित्येक वेळाने अन्य दोन प्रवासी आले. त्यानंतर अन्य एक प्रवासी आल्याने त्याच रिक्षाच्या मागे असलेल्या रिक्षाचा चालक (एमएच 048-सीडब्ल्यू-6646) तेथे आला व पुढील रिक्षात सुरुवातीलाच बसलेल्या प्रवाशाला जबरदस्तीने रिक्षाचालकाशेजारी बसण्यासाठी सांगू लागला, मात्र प्रवाशाने त्याला नकार दिला. त्यामुळे या रिक्षाचालकाने अन्य रिक्षाचालकांना गोळा करून या प्रवाशाबद्दल त्यांच्याकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. आपण का पुढे बसावे? असा प्रश्न त्या रिक्षाचालकाला प्रवाशाने केला. त्यावर त्याला उत्तर न देता आल्याने संतापलेल्या रिक्षाचालकाने अन्य रिक्षाचालकांच्या मदतीने प्रवाशावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, इतर रिक्षाचालकांनी मध्यस्ती करत त्या रिक्षावाल्याला समजवण्याचा प्रयत्न केला असला तरी रिक्षाचालकांच्या या हल्लेखोरीमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. वाहतूक पोलीस, आरटीओ अथवा अन्य कुणाकडे तक्रार केल्यास दखल घेतली जात नसल्याने कोणी तक्रार करण्यासही पुढे येत नसल्याची खंत काही प्रवासी व्यक्त करतात. तर केवळ भांडणतंटा नको म्हणून काही प्रवासी रिक्षाचालकांच्या उद्दामपणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे काही प्रवासी सांगतात.
रिक्षाचालक कोणत्याही परिस्थितीत प्रवाशाला त्याच्या आसनावरून उठवू शकत नाहीत. शिवाय कोणत्याही प्रवाशाला गाडीतून उतरवू शकत नाही. एखाद्या वेळी एखादी महिला प्रवासी आली आणि प्रवाशाने सौजन्य दाखवले तरच तो रिक्षाचालकाशेजारी बसू शकतो. पण रिक्षाचालक मागे बसलेल्या प्रवाशांना पुढे येऊन बसण्यास सांगत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. केवळ आपली गाडी तात्काळ भरावी, जादा भाडे मारता यावे, यासाठी काही रिक्षाचालक असा उद्दामपणा करताना आढळतात. अशा वेळी ते आपल्याला प्रवाशांची किती काळजी आहे आणि किती लवकर त्यांना स्थानकात जाता येईल, असा आव आणत असले तरी कित्येक वेळा संपूर्ण गाडी भरली नाही तर हेच रिक्षाचालक सुरुवातीला येऊन बसलेल्या प्रवाशांना कित्येक तास ताटकळत गाडीत बसवून ठेवतात. त्यामुळे जबरदस्ती करणार्या अशा रिक्षाचालकांवर कारवाई व्हायला हवी.
– रघुनाथ कळभाटे, अध्यक्ष, जनता दल, वसई-विरार शहर
…………………….
अशाप्रकारे रिक्षाचालक प्रवाशांवर जबरदस्ती करू शकत नाही. रिक्षाचालक तसे करत असेल तर ते चुकीचे आहे. अशा रिक्षाचालकांवर आम्ही नक्की कारवाई करू.
– संपतराव पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक, वसई
……………
प्रवाशांना पुढे बसण्यास सांगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. कोणताही रिक्षाचालक प्रवाशांना पुढे बसण्यास भाग पाडत असेल आणि त्यासाठी जबरदस्ती करत असेल तर अशा रिक्षाचालकाचे लायसेन्स आणि परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा.
– विजय खेतले, ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ
……………….
वसई-विरार शहरात कित्येक रिक्षा या अनधिकृत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही आधीच आरटीओकडे केली आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी दारू, गांजा आणि प्रवाशांशी उद्दामपणा करणार्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. केवळ अशा रिक्षाचालकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे.
– विश्वास सावंत, पालघर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष
………………….
एखादी अपंग व्यक्ती असेल, गरोदर महिला अथवा वयस्कर व्यक्ती आली असेल तर एखादा रिक्षाचालक प्रवाशाला पुढे बसण्यास विनंती करू शकतो. अन्यथा, तो प्रवाशावर पुढे बसण्यास जबरदस्ती करू शकत नाही. तसे तो करत असेल तर तो गुन्हा आहे. अशा रिक्षाचालकांवर कारवाई व्हायला हवी.
– महेश कदम, उपाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना वसई-विरार शहर
…………………………………….
वसई-विरार शहरातील रिक्षाचालकांचा उद्दामपणा आणि अरेरावीसंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधण्यासाठी फोन केला असता त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.